Saturday, January 8, 2022

पुसद पत्रकार दिन ...

Jan 07, 2022 पुसद पत्रकार दिन ...
पत्रकार दिनानिमित्त यवतमाळ जिल्ह्यातील पुसद पत्रकार संघाच्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून सहभागी व्हायची संधी मिळाली. हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्यासारख्या दिग्गज व दूरदृष्टीच्या नेत्यांचा हा तालुका. पुढे सुधाकरराव नाईक यांनी राज्याचे नेतृत्व केले. त्यांची तिसरी, चौथी पिढी आता राजकारण व समाजकारणात सक्रिय आहे. इतरही नेते विकासासाठी झटत आहेत आणि म्हणूनच मागासलेपणाची ओळख पुसून हा तालुका कात टाकून झपाट्याने विकसित होताना दिसतो आहे. स्वाभाविकच इथल्या नागरीकांची, संस्थांची सामाजिक जाण जागी आहे, जे पत्रकार संघाच्या कार्यक्रमास लाभलेल्या विविध क्षेत्रीय मान्यवरांच्या उपस्थितीवरूनही लक्षात आले. प्रमुख अतिथी असल्याने बोलायला सर्वात शेवटी म्हणजे उशिराच नंबर लागला, पण श्रोते अखेरपर्यंत टिकून होते आणि मनसोक्त दादही देत होते हे विशेष.
माध्यम क्रांतीचा विस्फोट झाला आहे. वृत्तपत्रांपाठोपाठ दृकश्राव्य माध्यमे, चॅनल्स, डिजिटल, वेब पत्रकारितेचे युग आले आहे. मोबाईल जर्नालिझम सुरू झाले आहे. बातमी देण्याचे काम सोशल मीडियाच करू लागला आहे. पण या सर्व धबडग्यात विश्वासार्हता पणास लागली आहे. ती टिकविण्याचे आव्हान पत्रकारितेपुढे आहे. सुदैवाने छापील शब्दावरचा वाचकांचा विश्वास अतूट आहे, त्यामुळे वृत्तपत्रांना अडचण नाही. कोरोनासारख्या संकटांनी संवेदनांचे महत्त्व लक्षात आणून दिले आहे. आपला अधीनायक हा सामान्य माणूस आहे, त्याची सुखदुःखे, व्यथा-वेदना जाणून घेणे, असहाय दुर्बल, रंजले गांजले, हिन दिन, दबलेल्या पिचलेल्या वर्गाचा आवाज बनणे गरजेचे झाले आहे. संवेदना व माणसातले माणूसपण जागवणारी, कळवळा प्रदर्शणारी पत्रकारिता गरजेची आहे ... अशा विविध मुद्द्यांवर बोलता आले.
कवी दीपक आसेगावकर यांच्या अध्यक्षतेत झालेल्या कार्यक्रमास काँग्रेसचे वरिष्ठ नेते डॉ. मोहम्मद नदीम जी, पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद भाऊ मैंद, गोवा व महाराष्ट्र बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष ऍड आशिष देशमुख, पुसद चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष सुरज डुब्बेवार, पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल चेंडकाळे, राजस्थानी मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गजबी, सरनाईक वाचनालयाचे अध्यक्ष योगेश राजे व सत्कारमूर्ती आमच्या लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार अखिलेश कुमार अग्रवाल आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यानिमित्त देशभक्त शंकरराव सरनाईक सार्वजनिक वाचनालय व हिंदी वाचनालयास भेटी दिल्या. तालुक्यासारख्या ठिकाणी वाचन चळवळ रुजविण्यासाठी या वाचनालयांनी चालवलेली धडपड खरेच कौतुकास्पद आहे. अखिलेशजी यांच्या आग्रहामुळे जाणे झाले.. Thanks Akhileshji
#PusadPatrakarSangh #SarnaikVachnalayPusad #HindiVachnalayPusad #KiranAgrawal

No comments:

Post a Comment