Wednesday, April 3, 2024

श्रद्धेचा योग जुळुनी आला...

March 20, 2024 श्रद्धेचा योग जुळुनी आला...
श्रद्धा असली की योग जुळून येतात, हेच खरे. शनिवारी लोकमत वर्धापन दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात आरसीसी क्लासेसचे प्रल्हाद कबीर यांनी श्री विठ्ठलाची अतिशय मोहक मूर्ती भेट दिली. पाहताच जीव जडावा असे ते सावळे, सुंदर रूप मनोहर..! संत नामदेव महाराज म्हणतात त्याप्रमाणे 'अनंत जन्मीचे विसरलो दुःख, पाहता तुझे मुख पांडुरंगा..' असेच माझे झाले. या सोहळ्यात विविध वाचकांनी दिलेली पुस्तके, तस्वीरी व पुष्पगूच्छे यांच्या गर्दीत नेमकी ही मूर्ती गेली 2/3 दिवस झाले आढळत नव्हती म्हणून जीव तीत गुंतला होता . आज ऑफिसला गेलो आणि ही मूर्ती टेबलावर बघून डोळे भरून आले. अखेर तिचा शोध घेऊन सहकारींनी ती टेबलावर आणून ठेवली. नेमकी आज आमलकी एकादशी आहे आणि त्याच दिवशी बा पांडुरंगाची ही अशी भेट ! माझ्या दृष्टीने माझ्या श्रद्धेतून घडून आलेला हा योगायोगच.
माझ्या वाड वडीलांच्या पिढ्या शेती कसणाऱ्या राहिल्या आहेत. पहिल्यापासून कुटुंबात श्री विठ्ठलाची भक्ती केली जातेय. बाकी कुणी कोणते उपवास करो न करो, आषाढी हमखास केली जाते. माझ्या आत्याने माझा सांभाळ केला. तिला मी चारही धामची यात्रा करून आणले, तेव्हा ती म्हणाली की, 'माझं सर्व काही झालं; पण माऊलीचे दर्शन राहिले. तेवढे एकदा पंढरपूरलाही घेऊन चल' आणि मी तिला पंढरपूर तुळजापूर दर्शनाला घेऊन गेलो होतो. त्यावेळी पंढरपूर संस्थानच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी पत्रकार म्हणून सन्मानासाठी आम्हा कुटुंबीयांना कार्यालयात बोलावले तर 'तुम्हाला कुठे जायचे ते जा, तेवढा वेळ मी माझ्या माऊली सोबत थांबते' म्हणत ती मंदिरात मूर्ती समोर बसून राहिली होती. ही मूर्ती हाती आली आणि साऱ्या आठवणी डोळ्यासमोर सर्रकन तरळून गेल्या. तुकोबारायांच्या शब्दात सांगायचे तर, 'आता दृष्टीपुढे ऐसाची तू राहे, जो मी तुजं पाहे पांडुरंगा..!' आता यानिमित्ताने दृष्टीपुढे नित्य माझा विठुराया राहणार आहे. आणखी काय हवे? #KiranAgrawal

No comments:

Post a Comment