Wednesday, April 3, 2024

शिक्षणाची बाराखडी गिरवून घेणारी बोराखेडीची शाळा

March 15, 2024 शिक्षणाची बाराखडी गिरवून घेणारी बोराखेडीची शाळा
काल मोताळा येथून बुलढाण्याकडे जात असताना वार्ताहराने आग्रह केला म्हणून बोराखेडीच्या जिल्हा परिषद शाळेत धावती भेट दिली आणि अवाकच झालो. जिल्हा परिषदेच्या शाळा म्हटल्या की आपल्या मनात मोडकळीस आलेल्या इमारतीपासून अस्वच्छ आवारापर्यंतचे चित्र साकारते, पण या शाळेच्या आवारात गेल्या गेल्या आपण एखाद्या खासगी संस्थेच्या टापटीप शाळेत आल्याचा 'फील' येतो. सरकारी नोकरीकडे केवळ पगाराचे साधन म्हणून न पाहता लोकसहभाग मिळवून समर्पण भावाने नोकरीतूनही सेवा कशी करता येते याचे उत्तम उदाहरण ठरणारा येथील स्टाफ दिसला. मुख्याध्यापक अनिल चव्हाण यांची सातत्यपूर्ण धडपड व त्यांना तितकीच तोलामोलाची साथ देणाऱ्या विशेषतः महिला शिक्षिका खरेच आपल्या स्वतःच्या लेकरांप्रमाणे या शाळेतील मुलांकडे लक्ष पुरवत आहेत, आणि म्हणून खासगी शाळांची स्पर्धा करतानाही येथील विद्यार्थी संख्या 250 वरून दुप्पट म्हणजे 450 वर गेली आहे.
केंद्र शासनाच्या योजनेत अगोदर आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून लौकिक लाभलेल्या या शाळेने आता राज्य शासनाच्या 'सुंदर माझी शाळा' उपक्रमात सुमारे 30 विविध निकषांमध्ये अव्वल येत जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकाविला. नवीन तंत्राशी जुळवून घेत या शाळेतील मुलांनी स्वच्छतेची महती सांगणारे वर्षभरात तब्बल 45 हजार व्हिडिओ समाज माध्यमांवर टाकून जनजागरण घडविले ही वेगळीच बाब येथे कळली. शिक्षणाच्या क्षेत्रात बदल घडवून इच्छिणाऱ्यांनी या शाळेला भेट देऊन त्यांची उपक्रमशीलता नक्कीच समजून घेण्यासारखी आहे... धन्यवाद पप्पू राठी जी, आपल्या आग्रहामुळे या शाळेस भेट देऊन तेथली अभिनवता जाणून घेता आली #ZPSchoolBorakhedi #KiranAgrawal

No comments:

Post a Comment