Thursday, May 19, 2022

काळाने संपविलेली हस्तकौशल्ये ...

May 17, 2022 काळाने संपविलेली हस्तकौशल्ये ...
कालसुसंगत प्रगतीचे गोडवे सर्वत्र गायीले जातात, पण याच बदलत्या कालचक्रात ज्या पारंपरिक उद्योगांच्या नरडीला नख लागून ते थेट अस्तंगतच होऊ पाहत आहेत त्याची फारशी चर्चा होताना वा त्याबद्दलची चिंता वाहिली जाताना दिसत नाही. उदा. कुंभार बांधवांचे घ्या. पूर्वी मातीचे माठ मोठ्या प्रमाणात विकले जात. आता घराघरात आरओ वॉटर फिल्टर येऊ लागल्याने माठांची मागणी प्रचंड घटली. फिरत्या चाकावर बोटाने आकार देऊन केल्या जाणाऱ्या मातीच्या पणत्या देवघरात वापरल्या जात. आता मशीनवर केल्या जाणाऱ्या सुबक व फॅन्सी पणत्या बाजारात मिळू लागल्याने मातीच्या पणत्या मागे पडल्या. कुंभार बांधवांना उरला वीट भट्टीचा व्यवसाय, तोही बहुतेक ठिकाणी इतर धनदांडग्यांनीच हडपला. परिणामी गरीब कुंभार बांधव रस्त्यावर आला. कासार समाजातले बांधव पूर्वी गावोगावी व घरोघरी जाऊन बांगड्या भरण्याचे काम करीत, आता ते राहिले नाही. पिंजारी बांधव गाद्या भरून देत, आता त्यातही आधुनिकता आलीय. सुतारी कामही आता मशीनवर होऊ लागले आहे. ज्याच्याजवळ पैसा तोच ही आधुनिकता वापरू शकतो, बाकीचे घरी बसले. गाव खेड्यातील अपवाद वगळता लोहाराचा भाताही थंडावला आहे, कारण त्याच्याकडून केल्या जाणाऱ्या लोखंडी वस्तूंची जागा अन्य सफाईदार मेटल्सने घेतली आहे. परीट, शिंपी, सुवर्णकार आदींच्या व्यवसायातही कालौघात मोठी स्थित्यंतरे झाली आहेत, आधुनिकता आली आहे. सर्वच क्षेत्रात प्रगती झाली. या प्रगतीच्या वाटेत पारंपरिकता लयास चालली. हस्त कौशल्याची वाट लागली... मॉल्समध्ये गर्दी होऊ लागली, दुकाने ओस पडू लागलीत. त्याही पुढे जाऊन आता घर बसल्या ऑनलाइन खरेदी विक्री सुरू झाल्याने काही हातांना काम मिळाले, परंतु पूर्वी ज्यांच्या हाती होते ते हिरावले गेले. अनेकांसमोर जगण्याचाच प्रश्न यातून उभा राहिला आहे.
अकोला लोकमतच्या रौप्यमहोत्सवी वाटचालीनिमित्त घेतल्या जात असलेल्या संवाद सत्रात बारा बलुतेदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी बोलताना हा मुद्दा अधोरेखित झाला. आधुनिकतेची कास धरताना जुने ते टाकून देण्यातून होत असलेली गफलत सर्वच जणांनी पोटतिडीकेने मांडली. हिरावल्या गेलेल्या आरक्षणासाठी बारा बलुतेदारांचा संघर्ष सुरू आहे. हे आरक्षण मिळेल तेव्हा मिळेल, परंतु एखादे आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून या वर्गाला व त्यांच्या अस्तंगत होत चाललेल्या व्यवसायाला जोपासण्याचा प्रयत्न सरकारला नक्कीच करायला हवा. बारा बलुतेदारांच्या मागण्या फार मोठ्या व फार खर्चिकही नाहीत. गेल्या कोरोनाच्या संकटात तर या वर्गाने खूप काही सोसले आहे. बादलीभर पाण्यातून तांब्याभर देण्याची भूमिका ठेवली तर अशक्य काही नाही... बारा बलुतेदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे, कार्याध्यक्ष गजानन वाघमारे, महादेवराव हुरपडे, गणेशराव वडतकर, गणेश पाळसुकर, निलेश दळवी, शेख अनिस पटेल, सचिन शहाकर, गजानन थुंकेकर, अंकुश बाळापुरे आदींनी या चर्चेत सहभाग घेतला. #LokmatAkola #KiranAgrawalLokmat #LokmatSamwadAkola

No comments:

Post a Comment