Sunday, May 15, 2022

गारेगारपाठोपाठ गरमागरम...

गारेगारपाठोपाठ गरमागरम...
एखाद्या समस्येचे तातडीने निराकरण झाले की काल आणि आज असे म्हणून दोन्ही फोटो वृत्तपत्रात आम्ही शेजारी शेजारी देत असतो. ... तसे हे माझे हिवाळा व उन्हाळ्यातील दोन फोटो. अकोल्याची ख्याती तशीही कडक उन्हासाठीच आहे. त्यामुळे गेल्यावर्षी नाशकातून येथे आलो तेव्हा सर्वांनीच सांभाळून राहण्याचे सल्ले दिले होते. आताही सर्वजण तेच विचारतात (अजून आजारी कसा पडलो नाही, याचे आश्चर्यही अनेकांच्या चेहऱ्यावर दिसते 😃) आलो तेव्हाही मे महिनाच होता, पण त्यावेळी कोरोना निर्बंधांमुळे बाहेर फिरताच येत नव्हते, त्यामुळे अधिकतर कार्यालयातच वेळ गेल्याने चटका फारसा जाणवला नव्हता. यंदा मात्र मार्चच्या अखेरपासूनच तापायला सुरुवात झाली होती. परिणामी फक्त डोळे उघडे ठेवून संपूर्ण चेहरा उपरणे/ गमछाने गुंडाळून वावरण्याची सवय लावून घेतली. अजून मे व जूनचाही पहिला आठवडा जायचा आहे. पुढचे काही दिवस तर उष्णतेची लाट येणार आहे म्हणे. त्यामुळे कसे व्हायचे? या विचारानेच डोकं तापतेय. ****
अर्थात अकोल्यात फक्त गरमच होते असेही नाही, गेल्या हिवाळ्यात चक्क हुडहुडीही अनुभवायला मिळाली; आणि तितकेच कशाला, भल्या पहाटे असे धुके बघितले की आपण हिल स्टेशनवर असल्याचा भास व्हावा. हे धुके पाहून तेव्हा सहकारिंशी बोललो तर म्हणाले होते की, ' तुम्हीच नाशिकवरून येता येता ही इतकी थंडी व धुकेही घेऊन आलात, नाही तर इथे असे धुके फारसे नसते' ... पण आता ऊन्हाबाबत असे म्हणू शकत नाही; कारण उन्हाचे पेटंट येथल्या नावावरच आहे. असो, सारे निसर्गचक्र बदलत चालले आहे. आपणही त्यानुसार बदलायला हवे... या गरमागरम वातावरणात वाजविणाऱ्यांना त्यांचे राजकीय भोंगे वाजवू द्या मित्रांनो, आपण मात्र संवेदनेचा, माणुसकीचा भोंगा वाजवूया... तृषार्थ जिवांसाठी पाण्याची व्यवस्था करूया व विशेषता पक्ष्यांसाठी घराच्या बाल्कनीत किंवा छतावर पाण्याचे भांडे ठेवूया.. वातावरण कितीही गरमागरम असो, आपण सहृदयतेचा गारवा पसरवूया... #KiranAgrawal

No comments:

Post a Comment