At present, working as a Executive Editor of Lokmat, Akola(Maharashtra). Known as a "Saraunshkar", because "Saraunsh" columns are written every Sunday on political and social issues. For excellence in journalism, honoured with Shanti Bhushan Puraskar, Girna Gaurav, Darna Gaurav, Shiva Gaurav, Vivekanand Yuva Gaurav, Maharashtra Govt Vikas Varta etc. Also awarded by "AGRASHRI". Participates in various debates on news channels.
Thursday, May 19, 2022
EditorsView published in Online Lokmat on May 19, 2022
सामान्यातल्या असामान्यत्वाला सॅल्यूट !
किरण अग्रवाल /
केवळ धन असून उपयोगाचे नसते, त्या धनाचा इतरांसाठी सदुपयोग करण्यासाठी मनही असावे लागते; पण बऱ्याचदा यातच गल्लत होताना दिसते. अपवाद वगळता आर्थिकदृष्ट्या सुसंपन्न वा धनाढ्य असलेली मंडळी 'स्व'मध्येच गुरफटलेली आढळून येते. त्यामुळे 'पीड पराई' जाणण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, याउलट सामान्य म्हणवणाऱ्या किंवा फाटक्या परिस्थितीच्या व्यक्तीकडून मात्र मोठ्या मनाने पर हितकारी भूमिका निभावली जाताना दिसून येते, तेव्हा सारेच काही अंधारलेले नसल्याची खात्री तर पटून जातेच; शिवाय काळ्या कॅनव्हासवरील या अशा पांढऱ्या ठिपक्यांमधून पाझरणारा माणुसकीचा झरा इतरांसाठी आदर्शही ठरून जातो.
राज्यातील राजकारण सध्या भोंगे, हनुमान चालीसा, आयोध्या, केतकी अशा मुद्यांभोवती फिरत आहे. राजकीय परिघावरचे वातावरण असे तापले आहे की त्यापुढे वास्तवातील वाढत्या तापमानाचा फटका कुणाला जाणवताना दिसत नाही. आता तर मान्सूनची वर्दी मिळून गेली आहे, नव्हे राज्याच्या काही भागात पावसाचा शिडकावा येऊनही गेला आहे. म्हणजे पावसाळा तोंडावर येऊन ठेपला आहे, पण आपल्याकडील उन्हाळी उपाय योजनांची कामे अनेक ठिकाणी झालेली नाहीत. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी जनता टाहो फोडत आहे, परंतु उन्हाळ्यापूर्वी मंजूर करून ठेवलेले पाणी टंचाई निवारणाचे अधिकतर आराखडे फाईलबंदच आहेत. राज्यकर्त्यांना त्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही म्हटल्यावर यंत्रणाही सुस्तावल्या आहेत. माणसांचेच हाल कोणी विचारे ना म्हटल्यावर पशु प्राण्यांची काळजी कोण घेणार? शेवटी मुकी जनावरे असलीत म्हणून काय झाले, त्यांनाही जीव आहेच की; म्हणून बस व रेल्वे स्थानकांमध्ये सावली शोधत गुरे-ढोरे येऊन बसत असल्याची छायाचित्रे बघावयास मिळत आहेत. इतकेच कशाला, एके ठिकाणी बँकेने उभारलेल्या वातानुकूलित एटीएम कक्षात गाईने आसरा घेतल्याचे छायाचित्रही बघावयास मिळाले.
महत्वाचे म्हणजे, उन्हाचा चटका वाढला असताना जागोजागी सामाजिक संस्था व व्यक्तींनी पुढे येऊन तृषार्थ जीवांची तहान भागविण्यासाठी प्रयत्न चालविल्याचे दिसून आले. यातही अपवाद वगळता आर्थिकदृष्ट्या सुसंपन्न असणारा एक घटक आपली स्वतःचीच काळजी वाहत असतांना सामान्यातली सामान्य व्यक्ती मात्र आपल्या परीने जमेल ती सेवा देऊ पाहताना दिसून येते तेव्हा माणुसकी शिल्लक असल्याची खात्री पटून जाते. विदर्भातील अकोल्यात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरच्या रस्त्यावर पादत्राणे शिवणारा शिवा पट्टे हा आपल्या तुटपुंज्या कमाईतून पांथस्थांसाठी गार पाण्याच्या कॅन भरून ठेवताना दिसतो तेव्हा सामान्यातल्या असामान्यत्वाची प्रचिती येऊन जाते. इतरांप्रतीचा कळवळा व हृदयस्थ ओलाव्यातून सेवा देणाऱ्या अशा व्यक्तींच्या पाठीशी समाजानेही बळ उभे करण्याची अपेक्षा गैर ठरू नये.
----------------
अर्थात, तात्कालिक उपायांचे सोडा; यासंदर्भात कायमस्वरूपी उपायांकडे लक्ष दिले जाणे गरजेचे बनले आहे. बदलत्या कालमानानुसार तापमान वाढतच जाणार आहे, त्यामुळे दरवर्षीच पाणी टंचाईच्या झळा अधिकाधिक प्रमाणात जाणवतील. विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय अन्न धोरण संशोधन संस्थेने नुकताच एक अहवाल प्रकाशित केला असून आगामी काळात वातावरण बदलाचे कसे परिणाम भोगावे लागतील हे निदर्शनास आणून दिले आहे. या अहवालानुसार येत्या 70/80 वर्षात उष्णतेच्या लाटांचे प्रमाण कैकपटींनी वाढणार असून त्याचा परिणाम अन्नधान्य उत्पादनावरही होईल. 2030 पर्यंत देशातील नऊ कोटीहून अधिक लोकांना उपासमारीचा सामना करावा लागेल अशी भीती वर्तविण्यात आली आहे. तापमान वाढीमुळे 2061 ते 2080 दरम्यान तब्बल 22.6 टक्क्यांपर्यंत घट होऊ शकेल असाही अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. तेव्हा तापमान वाढीचा विषय केवळ पाणीपुरवठयापुरता मर्यादित नाही. म्हणून सर्वांगाने त्यावर विचार करून पारंपरिकपणे जुजबी उपाययोजनांवर वेळ न दवडता शास्वत वा कायमस्वरूपी उपाययोजनांचा विचार व्हायला हवा. तो करतानाच यासंदर्भात माणुसकी धर्म जोपासत काम करणाऱ्या संस्था व व्यक्तीच्या सेवेची दखल घेत इतरांनीही त्यांच्या कार्यास जमेल तसा हातभार लावावयास हवा, इतकेच यानिमित्ताने...
https://www.lokmat.com/editorial/salute-the-abnormality-in-general-a310/?fbclid=IwAR12Txr_qauWsMNwIQvBMbmpEnuw2BjfkUOradKDK3SmqTbDse-gVHaVTDk
Labels:
EditorView
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment