Thursday, May 12, 2022

#SrilankaDiary06 ...

#SrilankaDiary06 ...
श्रीलंकेतील अर्थकारण विशेषता पर्यटनावर अवलंबून आहे, त्यामुळे तेथील हॉटेल उद्योगही जोरात असतो. अनेक हॉटेल्समध्ये आंतरराष्ट्रीय मानकांनुसार सोयी-सुविधा व जेवण उपलब्ध असल्याचे दिसून येते. आम्ही कोलंबोत 'मूव्ह एन पिक' मध्ये थांबलो होतो. या हॉटेलच्या 24 व्या मजल्यावरील तरण तलावातून दिसणारे 'सी फेस' व कोलंबो नगरीचे दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारे होते.
बेंटोटा मध्ये सागर किनारीच असलेल्या 'सिनोमॉन बे'मध्ये परदेशी पर्यटकांची मोठी वर्दळ होती. तेथील आलू पराठा व नारळाच्या आमटीसह खायचा राईस याची चव भारीच होती. येथल्या बहुतेक हॉटेल्समध्ये सी फुड्सचे प्रमाण अधिक असते. ते खाणाऱ्यांची तिथे खरी चंगळ होते. शाकाहारीना भात, तंदूर रोटी व बेकरी अटम खाऊन तसेच पायनापल व टरबुजाचा ज्यूस पिऊनही दिवस आरामात काढता येतात. केळीही मुबलक मिळतात. तिथे वेगळेच केशरी नारळ भेटतात, त्यात मलाई कमी पण पाणी भरपूर असते. तेही सर्वात उत्तम. इंग्रजी, तमिळ, हिंदी भाषा अवगत असलेले टॅक्सीचालक व गाईड्स भेटतात, त्यामुळे भाषेची फारशी अडचण येत नाही.
गाले फेसवर फिरताना एकाने आपल्या राज कपूरचे 'मेरा जूता है जपानी..' हे गाणे म्हणून दाखविले. भारी मजा आली व अभिमानाने ऊर भरून आला. अखेर गरज नसताना व महाग असतानाही त्याच्याकडील रुमालाची खरेदी करून आम्ही त्याला भारतीय गाणे म्हटल्याबद्दलची राजीखुषीने जणू बिदागीच दिली. श्रीलंकन लोकगीतांचा लहेजा व आपल्या भारतीय लोकसंगीताचा ठेका जवळपास सारखाच वाटतो, त्यामुळे गीतातले शब्द समजत नसले तरी त्या ठेक्यावर ताल धरायचा मोह होतो. थोडक्यात राहणीमान, संस्कृती, संगीत आदीबाबत श्रीलंकेत व आपल्यात फारसा फरक जाणवत नाही. सागर किनारे... चा आनंद घ्यायचा तर पर्यटनासाठी श्रीलंका हा उत्तम चॉईस ठरावा. ना कसली दगदग ना धांगडधिंगा. अतिशय सुरक्षित पर्यटन. शिवाय तुलनेने इतर देशांपेक्षा आवाक्यातला खर्च येणारा हा देश.
योगायोगही कसा असतो बघा, बरोबर रामनवमी ते हनुमान जयंती असा हा आमचा दौरा झाला; आणि तो देखील रावणाच्या लंकेत. सारे रामायण जणू जुळुन आले... अर्थात वेळेअभावी रावणाच्या साम्राज्यात व अशोक वाटिकेकडे जाता आले नाही, पण बाली इंडोनेशियात जसे जागोजागी राम, कृष्ण, सुग्रीव सांगितले जातात तसे उर्वरित श्रीलंकेत रावणाची आठवण काढतांना फारसा कुणी आढळत नाही. #SrilankaTour #KiranAgrawal

No comments:

Post a Comment