At present, working as a Executive Editor of Lokmat, Akola(Maharashtra). Known as a "Saraunshkar", because "Saraunsh" columns are written every Sunday on political and social issues. For excellence in journalism, honoured with Shanti Bhushan Puraskar, Girna Gaurav, Darna Gaurav, Shiva Gaurav, Vivekanand Yuva Gaurav, Maharashtra Govt Vikas Varta etc. Also awarded by "AGRASHRI". Participates in various debates on news channels.
Thursday, May 12, 2022
EditorsView published in Online Lokmat on May 12, 2022
विवाह विषयक समस्यांमधील वाढ चिंताजनक ...
किरण अग्रवाल /
समाजा समाजातील प्रथा परंपरा, विधी कार्य बाबतचा वारसा चालविणाऱ्या व्यवस्था डळमळीत होतात किंवा लुळ्या पांगळ्या बनतात तेव्हा व्यक्तीवादाचे स्तोम फोफावल्या खेरीज राहत नाही. यातून व्यवस्थांचा धाक संपून कसल्याही यशापयशाची जबाबदारी व्यक्तीकेंद्रित होते. संयुक्त कुटुंब पद्धतीतून विभक्ततेकडे वळलेल्या एकल परिवारांमध्ये तर ते प्रकर्षाने होताना दिसते. नव दाम्पत्यांमधील वाढते घटस्फोटांचे प्रमाण व लग्नादि कार्यामधील फसवणुकीचे प्रकारही या एकल निर्णय प्रक्रियेतूनच घडून येत असल्याचे चित्र बघता समाजाचे नेतृत्व करणाऱ्या ज्ञाती संस्थांनी व समाज धुरीणांनी याकडे गांभीर्याने लक्ष पुरविणे गरजेचे बनले आहे.
आज प्रत्येकच समाजात सोयरीक म्हणजे नातेसंबंध जमण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात उपस्थित झालेला दिसत आहे. कौटुंबिक व सामाजिक स्थित्यंतरे याला कारणीभूत आहेत. नोकरी वा रोजगाराच्या निमित्ताने तरुण मंडळी शहरात गेली, कुटुंबातील कर्त्या व ज्येष्ठांपासून ती दुरावली; पर्यायाने स्वतःच निर्णयकर्ती बनली. यातून सामाजिक व्यवस्थांनाही सुरूंग लागले. या शहरात गेलेल्या पिढीस गाव, खेड्यात यावेसे वाटत नाही. आज खेड्यात कुणी मुलगी देऊ इच्छित नाही. प्रत्येकच वधूपित्याला शहरात नोकरी करणाऱ्या जावयाचा शोध असतो. अधिकतर मुलींनाही सासू सासरे अगर दिर नणंदेची जबाबदारी नकोशी वाटते. यात केवळ जबाबदारीच नसते, तर आपुलकी, कौटुंबिक सहचराचे भावनिक बंधही असतात; पण तेच टाळण्याकडे अधिकेतरांचा ओढा दिसून येतो. यामुळे अनेक कुटुंबातील उपवर मुला-मुलींचे वय वाढत चालले आहे. तसेही शिक्षणातील दीर्घकालिकतेमुळे व करिअरचा बाऊ वाढल्यामुळेही लग्नाचे वय वाढलेच आहे, त्यात मुले व त्यांच्या पालकांच्याही वाढत्या अपेक्षांमुळे अधिक कालापव्यय होताना दिसतो. 'प्रॉपर मॅचिंग' होत नसल्याच्या तक्रारी त्यातुनच वाढल्या आहेत.
-----------------------
महत्वाचे म्हणजे, आधुनिकतेची कास धरीत मुले मुली स्वतःच आपला जोडीदार निवडू लागले आहेत. वधू वर सूचक व डेटिंग एप्सही आल्याने कुटुंबातील ज्येष्ठ व चिर परिचितांकडून सामाजिक जाणिवेतून होणारी विचारपूस, देखभाल थंडावली आहे. वाड.निश्चय करताना पारंपरिकतेने बैठकीत सुपारी फूटण्यामागे राहणारा नैतिक व सामाजिक जबाबदारीचा भावबंध इंटरनेटवरून जुळणाऱ्या संबंधांमध्ये अभावानेच आढळतो आणि मग चार चौघांच्या, म्हणजे समाज साक्षीने न होणाऱ्या अशा संबंधांमध्ये जेव्हा मिठाचा खडा पडतो तेव्हा पश्चात्ताप व अश्रू गाळण्याखेरीज हाती काही लागत नाही. वयाचा अल्लढपणा म्हणा, की समजदारीचा अभाव; भ्रामक व भौतिक बाबींच्या आहारी जाऊन निर्णय घेतले जातात व वास्तविकतेची पोलखोल होते तेव्हा वेळ हातातून निघून गेलेली असते. विवाहपूर्व फसवणुकीपासून ते विवाहोत्तर संबंध विच्छेदापर्यंतचे प्रकार यातून घडून येतात. खोटी आश्वासने देऊन किंवा बतावणी करून केलेली लग्ने, अगोदरच विवाहित असताना ते दडवून पुन्हा मांडलेला लग्नाचा पाट व लग्नानंतरच्या छळवणुकीला कंटाळून घेतल्या जाणाऱ्या घटस्फोटाच्या घटना अलीकडच्या काळात वाढलेल्या दिसत आहेत त्या त्यामुळेच.
------------------------
सहन न होणारी व सांगताही न येणारी ही समस्या वा दुःख असते. तेव्हा ते टाळायचे तर यासंबंधाने विकलांग होत असलेली सामाजिक जाणिवेची व्यवस्था मजबूत करणे गरजेचे आहे. कुटुंबात मुलांसोबत असावा लागणारा पालकांचा मैत्रीभाव व सामाजिक व्यवस्थांबद्दलचा विश्वास यासाठी दृढ केला जावयास हवा. आज नोकरीनिमित्त घराबाहेर पडलेल्या मुला-मुलींशी पालकांचा संवाद कमी होत चालला आहे. आई-वडिलांशीच संवाद कमी म्हटल्यावर कुटुंबातील इतर ज्येष्ठांशी केवळ प्रसंगानुरुप औपचारिक बोलण्याखेरीज कोण बोलणार? यातून नात्यांचे व त्यातून मर्यादांचे बंध सैलावत चालले आहेत. व्यक्तिगत एकारलेपण आकारास येऊ पाहते आहे व तेच भविष्यातील समस्यांना जन्म देणारे ठरत आहे. विवाह विषयक समस्या त्यातूनच वाढीस लागलेल्या दिसत आहेत. अनिष्ठ वा अप्रिय रीतीरिवाज वगळता पुर्वापार चालत आलेल्या सामाजिक म्हणजे चार चौघांशी सल्लामसलतीची व्यवस्था डळमळीत न होऊ देणे म्हणूनच गरजेचे ठरावे.
https://www.lokmat.com/editorial/matrimonial-problems-encrease-a310/?fbclid=IwAR0iZKrC1LXAkG3zvhUtepJM4NqYIuugE8zZ3MbpL3ojCcARkxrRJ0NRoDo
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment