Friday, August 26, 2022

सांग सांग भोलेनाथ, प्रशासन सुधारेल का? ...

August 20, 2022 सांग सांग भोलेनाथ, प्रशासन सुधारेल का? ...
अकोल्याचा लोकोत्सव म्हणवली जाणारी कावड यात्रा अवघ्या 24 तासांवर येऊन ठेपली आहे. उद्या या वेळपर्यंत ग्रामदैवत राजराजेश्वराची पालखी कावड भरणासाठी गांधीग्रामकडे रवानाही झालेली असेल, परंतु अद्याप यासंबंधी प्रशासनाच्या पातळीवरून करावयाची कामे मार्गी लागलेली दिसत नाहीत. स्थानिक प्रशासनाची ही निबरता केवळ दुर्दैवीच नसून, अकोलेकरांच्या श्रद्धेच्या उत्सवाप्रतीची असंवेदनशीलता दर्शविणारीही आहे. भलेही येथले शीर्षस्थ अधिकारी नवीन आहेत, त्यांना या उत्सवाबद्दलची पुरेसी माहिती नाही; पण कावड मंडळांनी वेळोवेळी अडचणी निदर्शनास आणून दिल्या असतानाही त्याकडे लक्ष दिले गेलेले नाही. कावड मार्गावर काँक्रीटच्या रस्त्यांमध्ये भेगा आहेत, रस्त्याच्या कडेला काँक्रीटमधील लोखंडी बार उघडे पडलेले आहेत... क्विंटलपेक्षा अधिक वजनाच्या कावड घेऊन जाणाऱ्या हजारोंच्या संख्येतील भक्तांना यापासून इजा होण्याची शक्यता नाकारता येणारी नाही. गांधीग्राममध्ये लाईटची व्यवस्था करण्यात आली आहे, परंतु अकोल्यात येईपर्यंतच्या रस्त्यावर अंधार असतो. पहाटे उजाडेपर्यंत हा रस्ता पार करणाऱ्या कावडधारकांना अंधाराशीच सामना करावा लागणार आहे, पण त्याही बाबतीत उपाय केला गेलेला दिसत नाही. शहरात आल्यावर हजारोंच्या संख्येतील कावडधारकांच्या प्रसाधनासाठी फिरत्या स्वच्छतागृहांची गरज आहे, पण महापालिका प्रशासन ढिम्म आहे. गांधीग्राममध्ये होणारी गर्दी लक्षात घेता व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश निघाले आहेत, पण रात्रीच्या वेळी शिवभक्तांना चहा पाणी कुठून उपलब्ध होणार? अकोल्यात याची मोफत व्यवस्था करणाऱ्या सामाजिक संस्थांनी गांधीग्राममध्येही किंवा वाटेत अशी काही व्यवस्था करता येईल का, याचा विचार करायला हवा... ****
कावड महोत्सव समितीचे अध्यक्ष राजेश भारती, माणकेश्वर मंडळाचे विठ्ठल गाडे, पवन महल्ले, ओंकारेश्वरचे विनोद शर्मा, रवीनाताई बरे, सुभद्राताई घरत यांनी लोकमतच्या संवाद सत्रात पोटतिडकीने आपली व्यथा मांडली. अजूनही एक दिवस हातात आहे. तातडीने यंत्रणा कामाला लावून जे जे काही करता येईल ते ते तातडीने करायला हवे. यासाठी स्थानिक प्रशासनाला भोलेनाथानेच सुबुद्धी द्यावी. हा अकोल्याचा लोकोत्सव आहे. अकोलेकरांच्या श्रद्धेचा उत्सव आहे, पंढरपुरची वारी करून येणाऱ्या वारकऱ्यांची पायधूळ मस्तकी लावण्याचे संस्कार आपल्यावर आहेत याची जाणीव ठेवून शिव भक्तांसाठी संवेदनशीलतेने याकडे बघायला हवे... #LokmatAkola #LokmatSamvadAkola #KiranAgrawalLokmat

No comments:

Post a Comment