Thursday, August 18, 2022

'डाकीया डाक लाया'चा आठव...

August 15, 2022 'डाकीया डाक लाया'चा आठव...
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करतोय, या 75 वर्षांच्या वाटचालीत विविध क्षेत्रात खूप मोठी प्रगती झाली. पोस्ट / टपाल खात्यानेही कात टाकली... टपाल पोहोचविण्याचं काम आता काहीसं मागे पडलय, कारण संपर्काची अन्य व गतिमान साधनं आलीत, पण सेवा थांबलेली नाही. खूप पूर्वी हेमामालिनी यांचा 'पलको की छाव मे' हा सिनेमा आला होता. त्यात 'डाकिया डाक लाया...' असं एक गाणं होतं. ते आजही मनात रुंजी घालतं. कारण, त्या काळात आजच्यासारखी मोबाईल क्रांती झालेली नव्हती, की गुगल पे - फोन पे सारखी सुविधा वा कुरिअर सर्व्हिस नव्हती. त्यामुळे लहानपणी शिक्षणासाठी बाहेर असताना वडिलांकडून येणारे टपाल व मनिऑर्डरसाठी होणारी तळमळ आणि साखरपुडा झाल्यानंतर लग्न होई पर्यंत 'ती'च्या पत्रासाठी लागून राहणारी हुरहूर अनुभवलेली आमची पिढी. गल्लीच्या कोपऱ्यावर पोस्टमन दादाच्या सायकलची घंटी ऐकू आली की ते घरी येईपर्यंत त्याच्यावर नजर खिळवून ठेवणारे आम्ही.. ते आमच्या दारी न येता पुढे निघून गेले की खिन्न होणारे आम्ही... एक वेगळीच आस व आनंद होता त्यात. नाशिक लोकमतमध्ये प्रकाश साबरे, शैलेश कर्पे, बाळासाहेब दराडे आदी काही सहकारी लाभले, जे टपाल खात्याशी संबंधित आहेत. नाशकात सुमारे दीड दशकाहून अधिक काळापासून रक्ताच्या नात्यापेक्षा अधिक आपलेपणाने शेजारधर्म निभावणाऱ्या सौ. सुरेखा क्षिरसागर वहिणी टपाल खात्यातच सेवेत आहेत... ****
... हे सारे आज आठवण्याचे व येथे नमूद करण्याचे कारण म्हणजे, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अकोला मुख्य पोस्ट कार्यालयात अकोला विभागाचे वरिष्ठ डाक अधीक्षक श्री संजय आखाडे यांच्या पुढाकाराने आयोजित टपाल खात्यातील कार्यकुशल सहकारिंच्या गुणगौरव सोहळ्यात प्रमुख पाहुणा म्हणून सहभागी होण्याची संधी लाभली. त्यानिमित्त टपाल खात्याशी संबंधित या आठवणींचा कल्लोळ मनात उठला. आज काळ बदलला तशी साधने बदलली, पण त्या संबंधीच्या आव्हानांना तोंड देत व विविध नवनवीन सेवा सुरू करीत टपाल खात्याने सामान्यांच्या सेवेचे कार्य अविरत चालविले आहे. विशेष आनंदाचा भाग म्हणजे, नाशिकच्या मखमलाबाद परिसरात भल्या पहाटे वृत्तपत्र वितरणाचे काम करून अतिशय प्रतिकूलतेत UPSC च्या परीक्षेत सुयश संपादन केलेल्या व पोस्टल डिपार्टमेंटच्या माध्यमातून नागरी सेवेत दाखल झालेल्या संजय आखाडे यांनी अडगळीत पडलेल्या या खात्याला येथे नवा चेहरा देण्याचा प्रयत्न चालविल्याचे दिसून आले. विविध सरकारी सेवा व योजनांमध्ये अकोल्याची टपाल सेवा त्यांच्या नेतृत्वात राज्यात लक्षवेधी ठरली आहे. त्यामुळे आखाडे यांच्या पुढाकाराने व वरिष्ठ डाकपाल हरिबाबू वंदना, उप विभागीय डाक प्रमुख सुनील हिवराळे, एन. एस. बावस्कार, एस. एस. नानीर आदींच्या मुख्य उपस्थितीत ऐतिहासिक भव्य दगडी वास्तूमध्ये टपाल खात्यातील पोस्टमन व अन्य सहकारीचा गौरव करताना खूप समाधान वाटले... #AkolaPostOffice #KiranAgrawal

No comments:

Post a Comment