Sunday, August 28, 2022

माझी दाढी, माझी ओळख..!

माझी दाढी, माझी ओळख..! श्रावणाचा आणि दाढीचा काय संबंध कुणास ठाऊक? पण आज कार्यालयात त्यावरून सहकारींशी चर्चा झडली. श्रावणात दाढी करता आली नाही इथून सुरू झालेली ही चर्चा पहिल्या दाढीधारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावापर्यंत पोहोचली. तितकेच कशाला, इतिहासाच्या गॅलरीत डोकावले तर अनेक महापुरुष दाढीधारी असल्याचे आढळून येते, आपण तर त्यांच्या नखाचीही सर करू शकत नाही. अलीकडच्या दूरचित्रवाहिन्यांच्या मालिकांमधील व चित्रपटातीलही आजचे अनेक हिरो कसे दाढीधारी आहेत, यावरही चर्चाचर्वण झाले. गुळगुळीत चेहऱ्याच्या राजकपूर, देवानंद, राजेंद्र कुमार, जितेंद्र यांचा काळ ते आजचा विकी कौशल, कार्तिक आर्यन, रणवीर, अभिषेक बच्चन यांचा काळ, अशीही चर्चा रंगली. 🎅🎅
मी म्हटले, मुळात अग्रवाल या आडनावाचा व दाढीचा तसा संबंध नाही, पण इयत्ता दहावीनंतर आलेल्या दाढीला मी अंतर दिले नाही. मागे कोरोना काळात तर ती जरा अधिकची वाढवूनही पाहिली होती. (त्यावेळच्या लॉकडाऊनमध्ये सलून शॉप्स बंद राहिल्याने अनेकांच्या हनुवटीवरील शेती छान बहरलेली दिसली होती) मी 28 वर्षांपूर्वी दाढीवर असताना बोहल्यावर चढलो व आजपर्यंत दाढी टिकुन आहे. तुमचे हिरो आज दाढीवर दिसतात. मी तेव्हापासून दाढी ठेऊन आहे, सोपं नाही मित्रांनो घरात अशी धिटाई दाखवणं! आता माझी दाढीच माझी ओळख बनून गेली आहे. त्यामुळे माझं नाव घ्यायला कचरणारे लोक आपल्या हनूवटीला हात लावून इशाऱ्यात बोलतात म्हणे 😃😃 असो, बाकी कुणाला 'अच्छे दिन' येवो न येवो, पण दाढीला ते आले म्हणायचे. नुकतेच विधिमंडळात ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी राज्यातील मुख्यमंत्री शिंदे यांची काळी दाढी व देशातील पांढऱ्या दाढीचा मुद्दा छेडून हशा व टाळ्या घेतल्या. दाढी हा इतक्या औत्सुक्याचा व चर्चेचा विषय होऊ शकतो, तर 'माझी दाढी, माझी ओळख..!' अशी मोहीम सुरू व्हायला काय हरकत आहे? **** अर्थात, श्रावणात दाढी वाढविलेल्यांनी ती उतरविण्याची घाई नको करायला, कारण पुढील महिन्यात म्हणजे सप्टेंबरच्या पहिल्या शनिवारी (यंदा 3 सप्टें.) जागतिक दाढी दिन (World Beard Day) साजरा केला जाईल. त्यासाठी दाढी नसलेल्यांनाही दाढी वाढवायला संधी आहे ... 🤣 🤣 तोपर्यंत चला, यानिमित्ताने आपापले दाढीतील छायाचित्र या पोस्टच्या कमेंट बॉक्स मध्ये टाकून आपणच आपल्या वेगळ्या रूपाचा आनंद अनुभवूया मित्रांनो... 🧔🏻🧔🏻🧔🏻🧔🏻 #KiranAgrawal #माझी_दाढी_माझी_ओळख! #WorldBeardDay

No comments:

Post a Comment