At present, working as a Executive Editor of Lokmat, Akola(Maharashtra). Known as a "Saraunshkar", because "Saraunsh" columns are written every Sunday on political and social issues. For excellence in journalism, honoured with Shanti Bhushan Puraskar, Girna Gaurav, Darna Gaurav, Shiva Gaurav, Vivekanand Yuva Gaurav, Maharashtra Govt Vikas Varta etc. Also awarded by "AGRASHRI". Participates in various debates on news channels.
Monday, May 30, 2022
वऱ्हाडी बोलीच्या दिंडीतला वारकरी...
May 29, 2022
वऱ्हाडी बोलीच्या दिंडीतला वारकरी...
मी बी तं वऱ्हाडीच हाव ना ब्वा ...
माही माय जळगाव जामोदची. माह्या जलम बी तठलाच,
मंग माह्या मायची जी भाषा, तीच माह्यी मायबोली;
म्हनुन तं घेतली खांद्यावर तिची पालखी राजा...
महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य, कादंबरीकार पुष्पराज गावंडे यांच्या आवतनावरून अ. भा. वऱ्हाडी साहित्य मंच आयोजित चौथ्या अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य संमेलनात प्रमुख पाहुणा म्हणून जाण्याचा योग आला.
आडनाव अग्रवाल असल्याने अनेकांना तर अगोदर मला मराठीच येते की नाही असा प्रश्न असतो, पण या संमेलनात वऱ्हाडीत थोडं बोललो.
व्यासपीठावरील मान्यवरांनी व व्यासपीठावरून खाली उतरल्यावर उपस्थितांमधीलही अनेकांनी याचे कौतुक केले...
वऱ्हाडी बोलीला लाभलेल्या लय व तिच्या प्रवाहीपणाबद्दल बोलताना यातील म्हणी तसेच शिव्यांची समृद्धताही मांडली.
बोलू वऱ्हाडी, लिहू वऱ्हाडी.. या घोषवाक्यात श्वास वऱ्हाडी असेही नमूद करण्याची व शाळा-शाळांमध्ये वऱ्हाडी शब्दांची प्रदर्शने भरविण्याची सुचना यावेळी केली.
संमेलनाच्या अध्यक्षस्थानी संत साहित्याचे अभ्यासक प्रा. डॉ. राजेश मिरगे होते, तर उद्घाटक डॉ. सतीश तराळ होते. व्यासपीठावर माऊली ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष ज्ञानेश्वर दादा पाटील, स्वागताध्यक्ष विनायक भारंबे, पुष्पराज भाऊ, श्याम ठक, नितीन वरणकार आदी मान्यवर समवेत होते.
उपक्रमशील शिक्षक तुळशीदास खिरोळकर व आमचे सहकारी राजू चिमणकर यांच्यासह प्रवासातही गप्पा झाल्या. रविवार छान गेला...
#VarhadiSammelan #KiranAgrawal
Saraunsh published in Akola Lokmat on May 29, 2022
http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20220529_2_5&fbclid=IwAR2gycfEaB5pXP3sM5R6OAg84fZt0ORx_ch1f7lHryPo2nEU9hXOk_o7T3M
https://www.lokmat.com/editorial/field-road-work-not-at-par-expectation-a310/?fbclid=IwAR2mHpEJoiFKn9AVkYGU2FDcPHFbZ-fiNmFnUfFIwpa45Gi5jCqsPIEw8eI
Thursday, May 26, 2022
EditorsView published in Online Lokmat on May 26, 2022
गरिबाच्या गरिबीत पडतेय भर...
किरण अग्रवाल /
कोरोनाच्या महामारीतून अजून आपण पूर्णतः बाहेर पडलेलो नाहीत. अजूनही ठीकठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळत असून हे संकट पुन्हा येऊ घातलेय की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे, पण असे असले तरी आपल्याकडे मोठ्या प्रमाणात झालेल्या लसीकरणामुळे या संकटाची आता तितकीशी झळ बसताना दिसत नाही हेदेखील खरे. अर्थात यातून बाहेर पडून सारे चलनवलन पूर्वीप्रमाणे सुरू झाले असले तरी या संकटाने अर्थकारण कसे उद्ध्वस्त करून ठेवले आहे ते आता समोर येऊ लागले आहे. दाओस परिषदेच्या पार्श्वभूमीवर ऑक्सफॅम इंटरनॅशनल या मान्यवर संस्थेने जाहीर केलेला अहवाल व भारताच्या पंतप्रधान आर्थिक सल्लागार परिषदेनेही जाहीर केलेल्या त्यांच्या अहवालातून तीच बाब अधोरेखित होऊन गेली आहे. श्रीमंतांच्या श्रीमंतीत भर पडण्याच्या व गरीब अधिकच गरीब होण्याच्या स्थितीवर नियंत्रण कसे मिळवता यावे हा त्यामुळे प्रश्नच ठरला आहे.
अल्पशा विश्रांतीनंतर कोरोनाने पुन्हा डोके वर काढायला सुरुवात केली असली तरी त्यातील जीवघेणेपण कमी झाले आहे. काहीसा सुस्कारा सोडावा अशी ही स्थिती असली तरी, आता आर्थिकदृष्ट्या कोरोनाने अनेकांना कसे रस्त्यावर आणून ठेवले आहे ते पुढे येऊ लागले आहे. आतापर्यंत लोकांकडे जी थोडीफार गंगाजळी होती त्यातून त्यांचा उदरनिर्वाह चालत आला, मात्र आता ओढाताण होऊ लागली आहे. व्यापार उद्योगाच्या बाबतीत बोलायचे तर बाजार उघडा आहे, पण खरेदी रोडावली आहे. अनेकांच्या गेलेल्या नोकऱ्या पुन्हा मिळालेल्या नाहीत. हाताला काम नाही व नवीन व्यवसाय सुरू करावा तर त्यात यशाची कोणतीही खात्री नाही, अशा कात्रीत सामान्य माणूस अडकला आहे. दिवसेंदिवस महागाईदेखील वाढत चालली असून अनेकांच्या किचनचे गणित कोलमडले आहे. राजकीय पक्ष व त्यांचे नेते मात्र त्यांच्या राजकारणाचे भोंगे वाजविण्यात मश्गूल आहेत.
------------------
आरोग्यासह अन्न व ऊर्जा क्षेत्रातील वाढत्या मागणीमुळे या उद्योगातील संबंधित उद्योगपतींचे चांगले झाले, पण सामान्य माणूस कंगाल होत चालला आहे. स्वित्झर्लंडच्या दाओस मध्ये झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर ऑक्सफॅम इंटरनॅशनलने एक अहवाल जाहीर केला असून, त्यानुसार कोरोना महामारी दरम्यान दर 30 तासात एक नवीन अब्जाधीश उदयास आला. जगातील अब्जाधीशांची एकूण संपत्ती जागतिक जीडीपीच्या 13.9 टक्के झाली आहे, जी 2000 मध्ये 4.4 होती. म्हणजे तिपटीने वाढ झाली आहे, पण दुसरीकडे गरीब अधिक गरीब झाला आहे. या वर्षी 26.30 कोटी लोक गरिबीच्या गर्तेत अडकणार असल्याची भीती या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. डोळे विस्फारणारी ही आकडेवारी असून कसे व्हायचे या पुढच्या काळात, याची चिंता लावणारी ती आहे, पण राजकारणावर चिंतन करणार्या राजकीय पक्षांकडून या गंभीर विषयावर चर्चा किंवा चिंतन होतांना दिसत नाही.
------------------
महत्त्वाचे म्हणजे, पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचा अहवालही नुकताच घोषित झाला असून, देशातील 15 टक्के कामगारांची महिन्याची कमाई ही अवघ्या पाच हजार रुपयांपेक्षाही कमी असल्याचे यात म्हटले आहे. श्रमशक्ती सर्वेक्षण आकडेवारीचा हवाला यासाठी देण्यात आला आहे. 2017 ते 2020 दरम्यान देशातील एक टक्का लोकांची कमाई 15 टक्क्यांनी वाढली, म्हणजे श्रीमंत अतिश्रीमंत झाले; परंतु सर्वात कमी उत्पन्न असणाऱ्या दहा टक्के लोकांचे उत्पन्न एक टक्क्यांनी कमी झाल्याचेही हा अहवाल सांगतो. जागतिक बँकेचे माजी अर्थतज्ञ कौशिक बसू यांनीही भारतात बेरोजगारीचा दर 24 टक्क्यांवर पोहोचला असून तो जगात सर्वाधिक असल्याचे म्हटले आहे. कोरोना आटोक्यात असला तरी या महामारीने अर्थकारण व जनजीवन कसे उध्वस्त करून ठेवले आहे तेच या अहवालातून स्पष्ट व्हावे. तेव्हा बेरोजगारी कमी करून अर्थ उद्योगाला चालना देण्यासाठी व वाढत चाललेली महागाई कमी करण्यासाठी काय करता येईल याकडे प्राधान्याने लक्ष देणे गरजेचे आहे, परंतु मूळ मुद्दे सोडून देशात सुरू असलेले परस्परांवर चिखलफेकीचे राजकारण बघता ते होईल याची आशा बाळगता येऊ नये.
https://www.lokmat.com/editorial/poors-become-more-poor-a310/?fbclid=IwAR03M7zytS4jdMwL8hnH5AgHWXrwFp-rbp3HDQ8lJC4x4Jx6vmuVCj_aSoM
Tuesday, May 24, 2022
चला माणूस होऊया ...
May 15, 2022
चला माणूस होऊया ...
आजच्या कम्युनिकेशनच्या 4जी, 6जी च्या युगातील भाषेत बोलायचे तर, बिस्किटांच्या 'पार्ले-जी' ची चव व मन अजूनही 'बच्चा है जी' ची जाणीव करून देणारे क्षण हाती लागतात तेव्हा कडक उन्हात आठवणींच्या शीतलहरी सुखावून गेल्याखेरीज राहत नाहीत.
परवा असेच काही क्षण वाट्यास आले. निमित्त होते, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आयोजिलेल्या स्वानंद व्यक्तिमत्व विकास शिबिराच्या उद्घाटनाचे.
यासाठी भारत विद्यालयात जाणे झाले व तेथील एका वर्गखोलीत सुमारे 70 / 80 विद्यार्थ्यांच्या ग्रुपसोबत बोलणे, बसणे झाले.
व्यक्तिमत्व विकासाचे शिबीर असल्याने याबाबतचे औपचारिक भाषण व उद्घाटकीय उपचार पार पडल्यानंतर व्यासपीठ सोडून मुलांमध्येच बेंचवर जाऊन बसलो व छान गप्पा केल्या.
शाळेतले दिवस परतून आल्याचा आनंद लाभला...
त्या काळीच नव्हे, तर आजही बहुसंख्य विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना हेच वाटते की आपली मुले डॉक्टर, इंजिनियर्स व्हावीत. आता सीए कडेही ओढा वाढला आहे.
पण या व नोकरीकडे नेणाऱ्या शिक्षणाखेरीजही खूप मोठे आकाश आहे.
विशेषतः कौशल्याधारित शिक्षण आज अधिक गरजेचे बनले आहे.
... आदी अनेक विषयांवर बोलताना एक आवर्जून सांगितले,
आयुष्यात कोणत्याही विद्या शाखेकडे जा. काहीही बना, पण शिकतांना - जगतांना माणूस नक्की बना!
कारण आज पैसे मोजून सर्व काही मिळतंय, ते मिळवण्याची हाव इतकी वाढली आहे की त्यासाठी धावताना माणसाची माणूसकीच सुटत चालली आहे.
नसत्या भोंग्यांचा कर्णकर्कश्य दणदणाट त्यामुळेच वाढला आहे.
म्हणूनच काहीसे विचित्र वाटेल आपल्याला, पण
#चला_माणूस_होऊया ...
पटतंय ना, हे आपल्यालाही मित्रांनो?
#KiranAgrawal
Saraunsh published in Akola lokmat on May 22, 2022
http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20220522_2_2&fbclid=IwAR2_6ZHt5edcBQlAXFzPyD15trv_CCQbr35ySPErqYYIdJClNBTgkjo-2vA
https://www.lokmat.com/editorial/change-is-fine-but-where-is-the-preparation-a310/?fbclid=IwAR1PIvzUnwAThtyTsMbK_KrKox5_8gEFSvpL3txzTO1EhVu-h3etdU6ynLs
Thursday, May 19, 2022
EditorsView published in Online Lokmat on May 19, 2022
सामान्यातल्या असामान्यत्वाला सॅल्यूट !
किरण अग्रवाल /
केवळ धन असून उपयोगाचे नसते, त्या धनाचा इतरांसाठी सदुपयोग करण्यासाठी मनही असावे लागते; पण बऱ्याचदा यातच गल्लत होताना दिसते. अपवाद वगळता आर्थिकदृष्ट्या सुसंपन्न वा धनाढ्य असलेली मंडळी 'स्व'मध्येच गुरफटलेली आढळून येते. त्यामुळे 'पीड पराई' जाणण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, याउलट सामान्य म्हणवणाऱ्या किंवा फाटक्या परिस्थितीच्या व्यक्तीकडून मात्र मोठ्या मनाने पर हितकारी भूमिका निभावली जाताना दिसून येते, तेव्हा सारेच काही अंधारलेले नसल्याची खात्री तर पटून जातेच; शिवाय काळ्या कॅनव्हासवरील या अशा पांढऱ्या ठिपक्यांमधून पाझरणारा माणुसकीचा झरा इतरांसाठी आदर्शही ठरून जातो.
राज्यातील राजकारण सध्या भोंगे, हनुमान चालीसा, आयोध्या, केतकी अशा मुद्यांभोवती फिरत आहे. राजकीय परिघावरचे वातावरण असे तापले आहे की त्यापुढे वास्तवातील वाढत्या तापमानाचा फटका कुणाला जाणवताना दिसत नाही. आता तर मान्सूनची वर्दी मिळून गेली आहे, नव्हे राज्याच्या काही भागात पावसाचा शिडकावा येऊनही गेला आहे. म्हणजे पावसाळा तोंडावर येऊन ठेपला आहे, पण आपल्याकडील उन्हाळी उपाय योजनांची कामे अनेक ठिकाणी झालेली नाहीत. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी जनता टाहो फोडत आहे, परंतु उन्हाळ्यापूर्वी मंजूर करून ठेवलेले पाणी टंचाई निवारणाचे अधिकतर आराखडे फाईलबंदच आहेत. राज्यकर्त्यांना त्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही म्हटल्यावर यंत्रणाही सुस्तावल्या आहेत. माणसांचेच हाल कोणी विचारे ना म्हटल्यावर पशु प्राण्यांची काळजी कोण घेणार? शेवटी मुकी जनावरे असलीत म्हणून काय झाले, त्यांनाही जीव आहेच की; म्हणून बस व रेल्वे स्थानकांमध्ये सावली शोधत गुरे-ढोरे येऊन बसत असल्याची छायाचित्रे बघावयास मिळत आहेत. इतकेच कशाला, एके ठिकाणी बँकेने उभारलेल्या वातानुकूलित एटीएम कक्षात गाईने आसरा घेतल्याचे छायाचित्रही बघावयास मिळाले.
महत्वाचे म्हणजे, उन्हाचा चटका वाढला असताना जागोजागी सामाजिक संस्था व व्यक्तींनी पुढे येऊन तृषार्थ जीवांची तहान भागविण्यासाठी प्रयत्न चालविल्याचे दिसून आले. यातही अपवाद वगळता आर्थिकदृष्ट्या सुसंपन्न असणारा एक घटक आपली स्वतःचीच काळजी वाहत असतांना सामान्यातली सामान्य व्यक्ती मात्र आपल्या परीने जमेल ती सेवा देऊ पाहताना दिसून येते तेव्हा माणुसकी शिल्लक असल्याची खात्री पटून जाते. विदर्भातील अकोल्यात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरच्या रस्त्यावर पादत्राणे शिवणारा शिवा पट्टे हा आपल्या तुटपुंज्या कमाईतून पांथस्थांसाठी गार पाण्याच्या कॅन भरून ठेवताना दिसतो तेव्हा सामान्यातल्या असामान्यत्वाची प्रचिती येऊन जाते. इतरांप्रतीचा कळवळा व हृदयस्थ ओलाव्यातून सेवा देणाऱ्या अशा व्यक्तींच्या पाठीशी समाजानेही बळ उभे करण्याची अपेक्षा गैर ठरू नये.
----------------
अर्थात, तात्कालिक उपायांचे सोडा; यासंदर्भात कायमस्वरूपी उपायांकडे लक्ष दिले जाणे गरजेचे बनले आहे. बदलत्या कालमानानुसार तापमान वाढतच जाणार आहे, त्यामुळे दरवर्षीच पाणी टंचाईच्या झळा अधिकाधिक प्रमाणात जाणवतील. विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय अन्न धोरण संशोधन संस्थेने नुकताच एक अहवाल प्रकाशित केला असून आगामी काळात वातावरण बदलाचे कसे परिणाम भोगावे लागतील हे निदर्शनास आणून दिले आहे. या अहवालानुसार येत्या 70/80 वर्षात उष्णतेच्या लाटांचे प्रमाण कैकपटींनी वाढणार असून त्याचा परिणाम अन्नधान्य उत्पादनावरही होईल. 2030 पर्यंत देशातील नऊ कोटीहून अधिक लोकांना उपासमारीचा सामना करावा लागेल अशी भीती वर्तविण्यात आली आहे. तापमान वाढीमुळे 2061 ते 2080 दरम्यान तब्बल 22.6 टक्क्यांपर्यंत घट होऊ शकेल असाही अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. तेव्हा तापमान वाढीचा विषय केवळ पाणीपुरवठयापुरता मर्यादित नाही. म्हणून सर्वांगाने त्यावर विचार करून पारंपरिकपणे जुजबी उपाययोजनांवर वेळ न दवडता शास्वत वा कायमस्वरूपी उपाययोजनांचा विचार व्हायला हवा. तो करतानाच यासंदर्भात माणुसकी धर्म जोपासत काम करणाऱ्या संस्था व व्यक्तीच्या सेवेची दखल घेत इतरांनीही त्यांच्या कार्यास जमेल तसा हातभार लावावयास हवा, इतकेच यानिमित्ताने...
https://www.lokmat.com/editorial/salute-the-abnormality-in-general-a310/?fbclid=IwAR12Txr_qauWsMNwIQvBMbmpEnuw2BjfkUOradKDK3SmqTbDse-gVHaVTDk
काळाने संपविलेली हस्तकौशल्ये ...
May 17, 2022
काळाने संपविलेली हस्तकौशल्ये ...
कालसुसंगत प्रगतीचे गोडवे सर्वत्र गायीले जातात, पण याच बदलत्या कालचक्रात ज्या पारंपरिक उद्योगांच्या नरडीला नख लागून ते थेट अस्तंगतच होऊ पाहत आहेत त्याची फारशी चर्चा होताना वा त्याबद्दलची चिंता वाहिली जाताना दिसत नाही.
उदा. कुंभार बांधवांचे घ्या. पूर्वी मातीचे माठ मोठ्या प्रमाणात विकले जात. आता घराघरात आरओ वॉटर फिल्टर येऊ लागल्याने माठांची मागणी प्रचंड घटली.
फिरत्या चाकावर बोटाने आकार देऊन केल्या जाणाऱ्या मातीच्या पणत्या देवघरात वापरल्या जात. आता मशीनवर केल्या जाणाऱ्या सुबक व फॅन्सी पणत्या बाजारात मिळू लागल्याने मातीच्या पणत्या मागे पडल्या.
कुंभार बांधवांना उरला वीट भट्टीचा व्यवसाय, तोही बहुतेक ठिकाणी इतर धनदांडग्यांनीच हडपला.
परिणामी गरीब कुंभार बांधव रस्त्यावर आला.
कासार समाजातले बांधव पूर्वी गावोगावी व घरोघरी जाऊन बांगड्या भरण्याचे काम करीत, आता ते राहिले नाही.
पिंजारी बांधव गाद्या भरून देत, आता त्यातही आधुनिकता आलीय.
सुतारी कामही आता मशीनवर होऊ लागले आहे. ज्याच्याजवळ पैसा तोच ही आधुनिकता वापरू शकतो, बाकीचे घरी बसले.
गाव खेड्यातील अपवाद वगळता लोहाराचा भाताही थंडावला आहे, कारण त्याच्याकडून केल्या जाणाऱ्या लोखंडी वस्तूंची जागा अन्य सफाईदार मेटल्सने घेतली आहे.
परीट, शिंपी, सुवर्णकार आदींच्या व्यवसायातही कालौघात मोठी स्थित्यंतरे झाली आहेत, आधुनिकता आली आहे.
सर्वच क्षेत्रात प्रगती झाली. या प्रगतीच्या वाटेत पारंपरिकता लयास चालली.
हस्त कौशल्याची वाट लागली...
मॉल्समध्ये गर्दी होऊ लागली, दुकाने ओस पडू लागलीत.
त्याही पुढे जाऊन आता घर बसल्या ऑनलाइन खरेदी विक्री सुरू झाल्याने काही हातांना काम मिळाले, परंतु पूर्वी ज्यांच्या हाती होते ते हिरावले गेले.
अनेकांसमोर जगण्याचाच प्रश्न यातून उभा राहिला आहे.
अकोला लोकमतच्या रौप्यमहोत्सवी वाटचालीनिमित्त घेतल्या जात असलेल्या संवाद सत्रात बारा बलुतेदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी बोलताना हा मुद्दा अधोरेखित झाला.
आधुनिकतेची कास धरताना जुने ते टाकून देण्यातून होत असलेली गफलत सर्वच जणांनी पोटतिडीकेने मांडली.
हिरावल्या गेलेल्या आरक्षणासाठी बारा बलुतेदारांचा संघर्ष सुरू आहे. हे आरक्षण मिळेल तेव्हा मिळेल, परंतु एखादे आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून या वर्गाला व त्यांच्या अस्तंगत होत चाललेल्या व्यवसायाला जोपासण्याचा प्रयत्न सरकारला नक्कीच करायला हवा.
बारा बलुतेदारांच्या मागण्या फार मोठ्या व फार खर्चिकही नाहीत. गेल्या कोरोनाच्या संकटात तर या वर्गाने खूप काही सोसले आहे.
बादलीभर पाण्यातून तांब्याभर देण्याची भूमिका ठेवली तर अशक्य काही नाही...
बारा बलुतेदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे, कार्याध्यक्ष गजानन वाघमारे, महादेवराव हुरपडे, गणेशराव वडतकर, गणेश पाळसुकर, निलेश दळवी, शेख अनिस पटेल, सचिन शहाकर, गजानन थुंकेकर, अंकुश बाळापुरे आदींनी या चर्चेत सहभाग घेतला.
#LokmatAkola #KiranAgrawalLokmat #LokmatSamwadAkola
Sunday, May 15, 2022
Saraunsh published in Akola Lokmat on May 15, 2022
http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20220515_2_6&fbclid=IwAR1lX-rv5IiV32hkJAdoA7Y94t9t6nuCCTsNmlCSotBHJiWaroxphZFaMjw
https://www.lokmat.com/editorial/seal-on-political-negativity-only-a310/?fbclid=IwAR1Cg7_SHT7GZBvMBcehE7HqAcrqKIOIAkDLNWMFXBDwL7wV8lA40FWbtfY
गारेगारपाठोपाठ गरमागरम...
गारेगारपाठोपाठ गरमागरम...
एखाद्या समस्येचे तातडीने निराकरण झाले की काल आणि आज असे म्हणून दोन्ही फोटो वृत्तपत्रात आम्ही शेजारी शेजारी देत असतो.
... तसे हे माझे हिवाळा व उन्हाळ्यातील दोन फोटो.
अकोल्याची ख्याती तशीही कडक उन्हासाठीच आहे.
त्यामुळे गेल्यावर्षी नाशकातून येथे आलो तेव्हा सर्वांनीच सांभाळून राहण्याचे सल्ले दिले होते. आताही सर्वजण तेच विचारतात (अजून आजारी कसा पडलो नाही, याचे आश्चर्यही अनेकांच्या चेहऱ्यावर दिसते 😃)
आलो तेव्हाही मे महिनाच होता, पण त्यावेळी कोरोना निर्बंधांमुळे बाहेर फिरताच येत नव्हते, त्यामुळे अधिकतर कार्यालयातच वेळ गेल्याने चटका फारसा जाणवला नव्हता.
यंदा मात्र मार्चच्या अखेरपासूनच तापायला सुरुवात झाली होती. परिणामी फक्त डोळे उघडे ठेवून संपूर्ण चेहरा उपरणे/ गमछाने गुंडाळून वावरण्याची सवय लावून घेतली. अजून मे व जूनचाही पहिला आठवडा जायचा आहे. पुढचे काही दिवस तर उष्णतेची लाट येणार आहे म्हणे. त्यामुळे कसे व्हायचे? या विचारानेच डोकं तापतेय.
****
अर्थात अकोल्यात फक्त गरमच होते असेही नाही, गेल्या हिवाळ्यात चक्क हुडहुडीही अनुभवायला मिळाली; आणि तितकेच कशाला, भल्या पहाटे असे धुके बघितले की आपण हिल स्टेशनवर असल्याचा भास व्हावा.
हे धुके पाहून तेव्हा सहकारिंशी बोललो तर म्हणाले होते की, ' तुम्हीच नाशिकवरून येता येता ही इतकी थंडी व धुकेही घेऊन आलात, नाही तर इथे असे धुके फारसे नसते'
... पण आता ऊन्हाबाबत असे म्हणू शकत नाही; कारण उन्हाचे पेटंट येथल्या नावावरच आहे.
असो, सारे निसर्गचक्र बदलत चालले आहे.
आपणही त्यानुसार बदलायला हवे...
या गरमागरम वातावरणात वाजविणाऱ्यांना त्यांचे राजकीय भोंगे वाजवू द्या मित्रांनो, आपण मात्र संवेदनेचा, माणुसकीचा भोंगा वाजवूया...
तृषार्थ जिवांसाठी पाण्याची व्यवस्था करूया व विशेषता पक्ष्यांसाठी घराच्या बाल्कनीत किंवा छतावर पाण्याचे भांडे ठेवूया..
वातावरण कितीही गरमागरम असो, आपण सहृदयतेचा गारवा पसरवूया...
#KiranAgrawal
Thursday, May 12, 2022
EditorsView published in Online Lokmat on May 12, 2022
विवाह विषयक समस्यांमधील वाढ चिंताजनक ...
किरण अग्रवाल /
समाजा समाजातील प्रथा परंपरा, विधी कार्य बाबतचा वारसा चालविणाऱ्या व्यवस्था डळमळीत होतात किंवा लुळ्या पांगळ्या बनतात तेव्हा व्यक्तीवादाचे स्तोम फोफावल्या खेरीज राहत नाही. यातून व्यवस्थांचा धाक संपून कसल्याही यशापयशाची जबाबदारी व्यक्तीकेंद्रित होते. संयुक्त कुटुंब पद्धतीतून विभक्ततेकडे वळलेल्या एकल परिवारांमध्ये तर ते प्रकर्षाने होताना दिसते. नव दाम्पत्यांमधील वाढते घटस्फोटांचे प्रमाण व लग्नादि कार्यामधील फसवणुकीचे प्रकारही या एकल निर्णय प्रक्रियेतूनच घडून येत असल्याचे चित्र बघता समाजाचे नेतृत्व करणाऱ्या ज्ञाती संस्थांनी व समाज धुरीणांनी याकडे गांभीर्याने लक्ष पुरविणे गरजेचे बनले आहे.
आज प्रत्येकच समाजात सोयरीक म्हणजे नातेसंबंध जमण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात उपस्थित झालेला दिसत आहे. कौटुंबिक व सामाजिक स्थित्यंतरे याला कारणीभूत आहेत. नोकरी वा रोजगाराच्या निमित्ताने तरुण मंडळी शहरात गेली, कुटुंबातील कर्त्या व ज्येष्ठांपासून ती दुरावली; पर्यायाने स्वतःच निर्णयकर्ती बनली. यातून सामाजिक व्यवस्थांनाही सुरूंग लागले. या शहरात गेलेल्या पिढीस गाव, खेड्यात यावेसे वाटत नाही. आज खेड्यात कुणी मुलगी देऊ इच्छित नाही. प्रत्येकच वधूपित्याला शहरात नोकरी करणाऱ्या जावयाचा शोध असतो. अधिकतर मुलींनाही सासू सासरे अगर दिर नणंदेची जबाबदारी नकोशी वाटते. यात केवळ जबाबदारीच नसते, तर आपुलकी, कौटुंबिक सहचराचे भावनिक बंधही असतात; पण तेच टाळण्याकडे अधिकेतरांचा ओढा दिसून येतो. यामुळे अनेक कुटुंबातील उपवर मुला-मुलींचे वय वाढत चालले आहे. तसेही शिक्षणातील दीर्घकालिकतेमुळे व करिअरचा बाऊ वाढल्यामुळेही लग्नाचे वय वाढलेच आहे, त्यात मुले व त्यांच्या पालकांच्याही वाढत्या अपेक्षांमुळे अधिक कालापव्यय होताना दिसतो. 'प्रॉपर मॅचिंग' होत नसल्याच्या तक्रारी त्यातुनच वाढल्या आहेत.
-----------------------
महत्वाचे म्हणजे, आधुनिकतेची कास धरीत मुले मुली स्वतःच आपला जोडीदार निवडू लागले आहेत. वधू वर सूचक व डेटिंग एप्सही आल्याने कुटुंबातील ज्येष्ठ व चिर परिचितांकडून सामाजिक जाणिवेतून होणारी विचारपूस, देखभाल थंडावली आहे. वाड.निश्चय करताना पारंपरिकतेने बैठकीत सुपारी फूटण्यामागे राहणारा नैतिक व सामाजिक जबाबदारीचा भावबंध इंटरनेटवरून जुळणाऱ्या संबंधांमध्ये अभावानेच आढळतो आणि मग चार चौघांच्या, म्हणजे समाज साक्षीने न होणाऱ्या अशा संबंधांमध्ये जेव्हा मिठाचा खडा पडतो तेव्हा पश्चात्ताप व अश्रू गाळण्याखेरीज हाती काही लागत नाही. वयाचा अल्लढपणा म्हणा, की समजदारीचा अभाव; भ्रामक व भौतिक बाबींच्या आहारी जाऊन निर्णय घेतले जातात व वास्तविकतेची पोलखोल होते तेव्हा वेळ हातातून निघून गेलेली असते. विवाहपूर्व फसवणुकीपासून ते विवाहोत्तर संबंध विच्छेदापर्यंतचे प्रकार यातून घडून येतात. खोटी आश्वासने देऊन किंवा बतावणी करून केलेली लग्ने, अगोदरच विवाहित असताना ते दडवून पुन्हा मांडलेला लग्नाचा पाट व लग्नानंतरच्या छळवणुकीला कंटाळून घेतल्या जाणाऱ्या घटस्फोटाच्या घटना अलीकडच्या काळात वाढलेल्या दिसत आहेत त्या त्यामुळेच.
------------------------
सहन न होणारी व सांगताही न येणारी ही समस्या वा दुःख असते. तेव्हा ते टाळायचे तर यासंबंधाने विकलांग होत असलेली सामाजिक जाणिवेची व्यवस्था मजबूत करणे गरजेचे आहे. कुटुंबात मुलांसोबत असावा लागणारा पालकांचा मैत्रीभाव व सामाजिक व्यवस्थांबद्दलचा विश्वास यासाठी दृढ केला जावयास हवा. आज नोकरीनिमित्त घराबाहेर पडलेल्या मुला-मुलींशी पालकांचा संवाद कमी होत चालला आहे. आई-वडिलांशीच संवाद कमी म्हटल्यावर कुटुंबातील इतर ज्येष्ठांशी केवळ प्रसंगानुरुप औपचारिक बोलण्याखेरीज कोण बोलणार? यातून नात्यांचे व त्यातून मर्यादांचे बंध सैलावत चालले आहेत. व्यक्तिगत एकारलेपण आकारास येऊ पाहते आहे व तेच भविष्यातील समस्यांना जन्म देणारे ठरत आहे. विवाह विषयक समस्या त्यातूनच वाढीस लागलेल्या दिसत आहेत. अनिष्ठ वा अप्रिय रीतीरिवाज वगळता पुर्वापार चालत आलेल्या सामाजिक म्हणजे चार चौघांशी सल्लामसलतीची व्यवस्था डळमळीत न होऊ देणे म्हणूनच गरजेचे ठरावे.
https://www.lokmat.com/editorial/matrimonial-problems-encrease-a310/?fbclid=IwAR0iZKrC1LXAkG3zvhUtepJM4NqYIuugE8zZ3MbpL3ojCcARkxrRJ0NRoDo
#SrilankaDiary06 ...
#SrilankaDiary06 ...
श्रीलंकेतील अर्थकारण विशेषता पर्यटनावर अवलंबून आहे, त्यामुळे तेथील हॉटेल उद्योगही जोरात असतो. अनेक हॉटेल्समध्ये आंतरराष्ट्रीय मानकांनुसार सोयी-सुविधा व जेवण उपलब्ध असल्याचे दिसून येते.
आम्ही कोलंबोत 'मूव्ह एन पिक' मध्ये थांबलो होतो. या हॉटेलच्या 24 व्या मजल्यावरील तरण तलावातून दिसणारे 'सी फेस' व कोलंबो नगरीचे दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारे होते.
बेंटोटा मध्ये सागर किनारीच असलेल्या 'सिनोमॉन बे'मध्ये परदेशी पर्यटकांची मोठी वर्दळ होती. तेथील आलू पराठा व नारळाच्या आमटीसह खायचा राईस याची चव भारीच होती.
येथल्या बहुतेक हॉटेल्समध्ये सी फुड्सचे प्रमाण अधिक असते. ते खाणाऱ्यांची तिथे खरी चंगळ होते.
शाकाहारीना भात, तंदूर रोटी व बेकरी अटम खाऊन तसेच पायनापल व टरबुजाचा ज्यूस पिऊनही दिवस आरामात काढता येतात. केळीही मुबलक मिळतात.
तिथे वेगळेच केशरी नारळ भेटतात, त्यात मलाई कमी पण पाणी भरपूर असते. तेही सर्वात उत्तम.
इंग्रजी, तमिळ, हिंदी भाषा अवगत असलेले टॅक्सीचालक व गाईड्स भेटतात, त्यामुळे भाषेची फारशी अडचण येत नाही.
गाले फेसवर फिरताना एकाने आपल्या राज कपूरचे 'मेरा जूता है जपानी..' हे गाणे म्हणून दाखविले. भारी मजा आली व अभिमानाने ऊर भरून आला. अखेर गरज नसताना व महाग असतानाही त्याच्याकडील रुमालाची खरेदी करून आम्ही त्याला भारतीय गाणे म्हटल्याबद्दलची राजीखुषीने जणू बिदागीच दिली.
श्रीलंकन लोकगीतांचा लहेजा व आपल्या भारतीय लोकसंगीताचा ठेका जवळपास सारखाच वाटतो, त्यामुळे गीतातले शब्द समजत नसले तरी त्या ठेक्यावर ताल धरायचा मोह होतो.
थोडक्यात राहणीमान, संस्कृती, संगीत आदीबाबत श्रीलंकेत व आपल्यात फारसा फरक जाणवत नाही.
सागर किनारे... चा आनंद घ्यायचा तर पर्यटनासाठी श्रीलंका हा उत्तम चॉईस ठरावा. ना कसली दगदग ना धांगडधिंगा. अतिशय सुरक्षित पर्यटन.
शिवाय तुलनेने इतर देशांपेक्षा आवाक्यातला खर्च येणारा हा देश.
योगायोगही कसा असतो बघा, बरोबर रामनवमी ते हनुमान जयंती असा हा आमचा दौरा झाला; आणि तो देखील रावणाच्या लंकेत.
सारे रामायण जणू जुळुन आले...
अर्थात वेळेअभावी रावणाच्या साम्राज्यात व अशोक वाटिकेकडे जाता आले नाही, पण बाली इंडोनेशियात जसे जागोजागी राम, कृष्ण, सुग्रीव सांगितले जातात तसे उर्वरित श्रीलंकेत रावणाची आठवण काढतांना फारसा कुणी आढळत नाही.
#SrilankaTour #KiranAgrawal
Sunday, May 8, 2022
Saraunsh published in Akola Lokmat on May 08, 2022
http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20220508_2_4&fbclid=IwAR1lovkilB4PC69AQjEVAjiDSaoZ_uqFsfHuMP-DmiKpcTGNpkFZAkkne7g
https://www.lokmat.com/editorial/dry-backpack-sore-throat-a310/?fbclid=IwAR0hAA0wLNpvp73sQPW-XOx0LBDUkSiYZ0BUYsNm2r7PNnF75WI9qzETGVo
#SrilankaDiary05 ...
#SrilankaDiary05 ...
कोलंबोतील पेट्टा मार्केट छान अशा तळ्याकाठी वसले आहे. या मार्केटमध्ये आता फारशी दुकाने राहिलेली नाहीत, पण केवळ निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी पर्यटक तेथे जातात. दुकाने नाहीत म्हणून तळ्याचे सौंदर्य लोपले आहे असे तेथे झालेले नाही.
श्रीलंकेत इतरही खूप बघितले, मनसोक्त भटकलो...
निसर्ग कवेत घेण्याचा बालिश प्रयत्न तर करून बघितलाच, फिशर मॅनच्या मदतीने समुद्रातील मासे पकडण्याचाही प्रयत्न केला. मजा आली.
श्रीलंका चहाच्या उत्पादनासाठीही मशहूर आहे म्हणून एका चहा उत्पादक कारखान्याला भेट देऊन उत्पादन प्रक्रिया समजून घेतली. मी चहा घेत नाही असे सांगितल्यावर संबंधितांचा चेहरा काहीसा उतरला, पण कंपनीच्या ब्रँडिंगसाठी चहाचा कप हाती घेऊन फोटो काढण्याची त्यांनी विनंती केली आणि मलाही तो मोह टाळता आला नाही. यापुढे जे कुणी भारतीय पर्यटक तेथे भेट देतील त्यांना माझा फोटो दाखविला जाणार आहे. (हे म्हणजे, चहा न घेणाऱ्याकडून चहाचे ब्रँडिंग; आहे की नाही गंमत)
विशेष म्हणजे, तेथील राजकीय अस्थिरतेच्या व आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर बहुतेक ठिकाणी पर्यटकांची संख्या रोडावलेली असल्याने आम्हास मनमोकळे फिरायला व बघायला मिळाले. काही ठिकाणी तर आमच्याखेरीज दुसरे चिटपाखरू नव्हते. बहुतेक छायाचित्रामधील विस्तीर्ण परिसरात मी एकटाच आपणास दिसतो आहे तो त्यामुळेच.
दुसरे व सर्वात महत्वाचे म्हणजे, भारतीयांबद्दल टिकून असलेली व सध्याच्या संकटात आणखीनच वाढीस लागलेली आत्मियता येथे प्रकर्षाने जाणवली हेदेखील आवर्जून नमूद करण्यासारखे...
#SrilankaTour #KiranAgrawal
Thursday, May 5, 2022
#SrilankaDiary04 ...
#SrilankaDiary04 ...
चहूदिशांनी जणू समुद्राच्या कुशीत वसलेल्या श्रीलंकेला नैसर्गिक लावणण्याचे वरदान लाभले आहे, असेच म्हणता यावे.
आपल्या मुंबईतील मरीन ड्राईव्ह प्रमाणे कोलंबोतील गाले फेस असो, की बॅनटोटाचा समुद्र किनारा; तेथे आपण स्वतःला हरवून बसतो. डोंगराच्या कडेवरील कॅंडी लेक पॉईंटवरून सायंकाळी दिसणारा नजारा अप्रतिमच!
बेंटोटाचा व गाले फोर्टचा निळाशार व नितळ असा समुद्र न्याहाळताना किती तरी वेळ कसा निघून जातो हे समजतच नाही.
गाले फोर्टला जाताना रस्त्यात एकच असे ठिकाण आहे, जेथे समुद्रात उंचच उंच बांबू रोवून त्यावर पर्यटकांना बसून फिशर मॅनच्या मदतीने मासेमारीचा अनुभव घेण्याची व्यवस्था केलेली आहे.
या बांबूवर बसून समुद्राच्या लाटा पाठिवर झेलत मासेमारीची कसरत करायची म्हणजे मोठे दिव्यच. जिवाच्या भीतीने शहारे आणणारा हा अनुभव असतो. तो घेतल्याखेरीज कळायचा नाही...
#srilankaTour #KiranAgrawal
Saraunsh published in Akola Lokmat on May 01, 2022
http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20220501_10_1&fbclid=IwAR2q4yvEFJ28VUqwllb8SrKt88Q8aOOMAx8mfcz9VVWHBZfqbPnfs5jlpOU
https://www.lokmat.com/editorial/not-politics-lets-sound-the-horn-of-humanity-a310/?fbclid=IwAR00fGzUKgDY7yFyZyJJAWmkvaNdTiq85hau0wRcLNoickrofCcEg65BlWc
लोकमत सखी सन्मान 2022 ...
लोकमत सखी सन्मान 2022 ...
केवळ प्रापंचिक जबाबदारीतून चार भिंतीत अडकून न राहता समाजाच्या विविध क्षेत्रांत अतुलनीय कार्य करून अवघे आकाश कवेत घेऊ पाहणाऱ्या वऱ्हाड प्रांतातील सखींना अकोल्यातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहातील भव्य सोहळ्यात लोकमत सखी मंचतर्फे ‘लोकमत’ सखी सन्मान २०२२ने गौरविण्यात आले.
जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे, मुख्य प्रायोजक, निर्मिक ग्रामीण विकास व बहुउद्देशीय संस्थेच्या जया अंभोरे, रेणुका वानखडे, सहप्रायोजक ब्राइट करिअर इन्स्टिट्यूटचे संचालक अभय पाटील, सुनील कुलकर्णी, हरनील गुजराल, ‘लोकमत’चे कार्यकारी संपादक किरण अग्रवाल, युनिट हेड अलोककुमार शर्मा, ‘लोकमत समाचार’चे प्रभारी अरुणकुमार सिन्हा यांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा पार पडला.
गौरवार्थी... प्रा.डॉ. इंदुमती लहाने (जीवनगौरव), डॉ. प्रियाकुमारी खिल्लारे (शिक्षण), मनीषा कुळकर्णी (क्रीडा), तारा माहेश्वरी (आरोग्य) , स्नेहल ढवळे (उद्योजक), प्रा.डॉ. स्वाती दामोदरे (साहित्य), संगीता इंगोले (सामाजिक) आणि डॉ. पूजा खेतान (सामाजिक).
याप्रसंगीची ही काही सहभाग चित्रे...
#LokmatAkola #LokmatSakhiSanmanAkola #KiranAgrawal
#SrilankaDiary03
#SrilankaDiary03 ...
श्रीलंकेत जाऊन सिगिरिया फोर्ट बघितला नाही तर काय उपयोग, असे म्हटले जाते.
युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेजच्या यादीतील समुद्रसपाटीपासून 350 मीटर उंच असलेल्या या सिगिरिया फोर्टची चढाई विलक्षण होती. हजार पायऱ्या चढून टॉपला पोहोचलो की सारा निसर्ग कवेत घ्यायचा मोह आवरता येत नाही. या उंचावरून घेतलेली उडी ही थेट ढगातच उडी घेतल्यासारखी वाटते. हा फोर्ट दाखवणारे सर्व गाईडस प्रत्येकच पर्यटकाला येथे अशा उड्या मारायला लावून त्या उड्या कॅमेऱ्यात कैद करतात, त्याची वेगळीच गंमत वाटते.
राजा धतुसेनेचा पुत्र राजा कश्यप (AD 477 - 495) चा राज्यकारभार चालणाऱ्या या किल्ल्याला व तेथील गुहेला तब्बल 5,500 वर्षांचा ऐतिहासिक वारसा आहे. संरक्षणाच्या उपाययोजनांसह पाणी व्यवस्थापनाचा तत्कालीन उत्कृष्ट नमुना येथे बघावयास मिळतो, जो आश्चर्यचकित करून जातो.
या फोर्टमध्येच, म्हणजे डोंगरातील गुहेत आपल्याकडील अजिंठा लेण्यातील कलाकुसरसारखे सेम टू सेम कलाकुसर आहे, पण अतिशय अल्प प्रमाणात. त्यापुढे आपले अजिंठा लई भारी वाटते.
भल्यामोठ्या अभेद्द अशा दगडावर वसलेला हा किल्ला होता, याला लॉयन रॉक म्हणूनही ओळखले जाते.
श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्याने चुकवू नये असा हा सिगिरिया फोर्ट आहे.
#SrilankaTour #KiranAgrawal
EditorsView published in Online Lokmat on April 28, 20222
भोंगा वाजवा माणुसकीचा!
किरण अग्रवाल / राज्यात सध्या भोंग्याच्या राजकारणाने माहोल तापला आहे. प्रार्थना स्थळावरील भोंग्यांपासून याची सुरुवात झाली, आणि आता काँग्रेसतर्फे ठीकठिकाणी वाढत्या महागाईबद्दल भोंगे वाजवून केंद्र सरकारला जागे केले जात आहे. धर्माला राजकारणाशी व समस्येला भोंग्याशी जोडण्याचा हा प्रयत्न पाहता सध्या भोंग्यांची चलती आहे, म्हणूनच या सर्व राजकीय कोलाहलात वाढत्या तापमानाने बेजार झालेल्या जीवांसाठी माणुसकीचा व संवेदनांचा भोंगा वाजण्याची अपेक्षा गैर ठरू नये.
हल्ली खऱ्यापेक्षा खोट्याला, आणि तेदेखील रेटून किंवा ओरडून सांगण्याला महत्त्व आले आहे. माध्यमांच्या दुनियेत तर त्यालाच अधिक 'न्यूज व्हॅल्यू' प्राप्त होऊ पाहते आहे, त्यामुळे गांभीर्याने लक्ष द्यावयाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष होऊन भलतेच विषय चर्चेत येणे स्वाभाविक ठरून गेले आहे. बरे, या विषयांचा गलका इतका होतोय, की त्याच्या आवाजापुढे निकडीच्या मुद्द्यांची किंकाळीही क्षीण व्हावी. गरजुंचे दुःख त्यात दबले जात आहे. सामान्य जनतेला कोणत्या समस्यांचा मुकाबला करावा लागतो आहे याची यत्किंचितही फिकीर न बाळगता धोरणकर्ता राजकीय वर्ग केवळ या गलक्यात अडकून पडला आहे हे दुर्दैव. परस्परांना आडवे जाण्यासाठी होणारे आरोप-प्रत्यारोप व राजकीय शह-काटशहाचा भाग म्हणून केली जाणारी आंदोलने वाढीस लागली आहेत, यात सामान्यांचा प्रश्न कुठेच दिसत नाही. पक्षासाठी आणि नेत्यांसाठी भांडाभांडी सुरू आहे, लोकशाहीतले लोक किंवा त्यांच्यासाठी कुठे काय आहे? म्हणूनच या राजकीय जुमलेबाजीत न पडता प्रशासन व समाजसेवी संस्था आणि व्यक्तींकडून माणुसकीचा भोंगा वाजविला जाणे गरजेचे बनले आहे.
यंदा उन्हाचा चटका अधिक तीव्रतेने जाणवतो आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरिसच तापमानाचे विक्रम नोंदविले जात आहेत, त्यामुळे पुढच्या मे महिन्यात काय व कसे व्हायचे याची चिंता लागून जाणे स्वाभाविक ठरले आहे. याच अनुषंगाने विचार करायचा तर, परंपरेप्रमाणे सर्वच ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी उन्हाळ्यातील संभाव्य पाणी टंचाईवरील उपाययोजनांचे टंचाई निवारण आराखडे तयार केले होते; पण आता उन्हाळा टीपेस पोहोचला तरी यातील अनेक उपाययोजना कागदावरच असल्याचे सार्वत्रिक चित्र आहे. विशेषता ग्रामीण भागातील माता-भगिनींना पाण्यासाठी भर उन्हात वणवण भटकण्याची वेळ आली असून टँकर्सची मागणी वाढू लागली आहे. पाणी पुरवठा योजनांना घरघर लागली असून विजेचे लोड शेडींगही सुरू झाल्याने शेतातील पिकांना पाणी देण्याचे चक्र कोलमडले आहे. कानठळ्या बसवणाऱ्या राजकीय भोंग्यामुळे या पाणीटंचाई बद्दलची ओरड राजकारण्यांना ऐकू येत नसावी, पण प्रशासनाने तरी याकडे तातडीने लक्ष पुरवायला हवे. उन्हाळा निघून गेल्यावर उपाय योजना आकारास आणून बिले काढण्याची मानसिकता न ठेवता पाण्याचा धर्म निभावण्याची भावना ठेवून याकडे तातडीने लक्ष पुरविले जाणे अपेक्षित आहे.
महत्वाचे म्हणजे, लोकांबरोबरच गुराढोरांना व पशु पक्षांनाही पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. बहुतेक ठिकाणचे नदी-नाले, पाणवठे, विहिरीही आटल्याने हा प्रश्न निर्माण झाला आहे. मनुष्यालाच पिण्याच्या पाण्याची बोंब असताना बिचार्या मुक्या जनावरांना कुठून पाणी मिळणार किंवा त्यासाठी ते कोणापुढे आंदोलन करणार? अनेक ठिकाणी तर चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. तेव्हा राजकारण्यांना करूद्या त्यांचे राजकारण, किमान प्रशासनाने व समाजसेवी संस्था, व्यक्तींनी यासाठी पुढे येत संवेदनांचे भोंगे वाजवत गरजूंसाठी शक्य त्या उपाययोजना करणे अपेक्षित आहे. शहरांमध्ये ते होतांना दिसतही आहे, नाही अशातला भाग नाही; परंतु खरी निकड ग्रामीण भागात असून तेथे हा संवेदनांचा झरा पोहोचणे गरजेचे आहे. राजकीय भोंगे कितीही वाजूद्या, माणुसकीच्या कळवळयातून लोकशक्तीचे भोंगे जेव्हा वाजू लागतील तेव्हा त्यापुढे राजकीय भोंग्यांचा आवाज आपसूकच क्षीण पडल्याखेरीज राहणार नाही. नंतर येऊ घातलेल्या निवडणुकीत कोणाचा भोंगा वाजवायचा, हे मतदार ठरवतीलच!
https://www.lokmat.com/editorial/play-the-horn-of-humanity-a310/?fbclid=IwAR3xtpJN4QtMO29dwglfke4uBC5cDGX1gc1P_fp4wHOqz9ZtVBw7gObmaeY
Subscribe to:
Posts (Atom)