Friday, October 3, 2025

श्रद्धा व सन्मानाचा संगम... Raver

17 Dec, 2024 श्रद्धा व सन्मानाचा संगम...
तब्बल 186 वर्षाची प्रदीर्घ परंपरा लाभलेल्या रावेरच्या श्री दत्त मंदिर संस्थानच्या रथोत्सवात श्रद्धेने सहभागी होतांना सन्मानाचे सद्भाग्यही लाभले. या संस्थानचे आदीसंत सद्गुरु श्री सच्चिदानंद स्वामी यांना रावेरमध्ये आणणाऱ्या तत्कालीन मान्यवरांमध्ये आमचे पणजोबा सेठ घनश्यामदास अग्रवाल यांचाही समावेश होता. पुढे त्यांनीच संस्थानला पहिला रथ बनवून अर्पण केला व रथोत्सवाची प्रथा सुरू झाली. तेव्हापासून संस्थान व आमच्या कुटुंबात श्रद्धेची नाळ जुळली आहे. विद्यमान गादीपती गुरुवर्य श्रीपाद महाराज व त्यांचा वारसा समर्थपणे सांभाळून या रथोत्सवाला अधिक लोकाभिमुख करणारे ऋषिकेश महाराज हा अनुबंध जपून आहेत. रथाचा प्रारंभ होतांना इतर मानकरी व सेवेकरींप्रमाणेच पहिल्या रथाचे दाते म्हणून आमचाही सन्मान केला जात असतो.
यंदा रथ पूजनाप्रसंगी वृन्दावनचे महंत लक्ष्मणदास महाराज, दिनबंधुदास महाराज, महंत केशवानंदजी व फैजपूरचे महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज, रावेरचे तहसीलदार श्री बंडू कापसे यांच्या समवेत सहभागी होण्याचा व आरतीचा सन्मान लाभला. विशेष म्हणजे रथ ओढण्याचा प्रारंभ दुर्गाशक्ती म्हणजे महिला भगिनींच्या हस्ते करण्याची अभिनव सुरुवात येथे करण्यात आली आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषात कासार, पाटील परिवाराने परंपरेने बजावलेल्या मोगरी लावण्याच्या कुशल सेवेने रथाची नगरपरिक्रमा उत्साहात संपन्न झाली. यानिमित्ताने रावेर व पंचक्रोशीतील बालपणीच्या मित्रांसमवेतच विविध मान्यवरांच्या भेटी झाल्या. Kiran Agrawal #RaverRathotsav #DattaMandirRaver

No comments:

Post a Comment