Thursday, August 6, 2026

लोकमत भारत रत्नमाला योजनेस उस्फुर्त प्रतिसाद ..

07 July, 2026 लोकमत भारत रत्नमाला योजनेस उस्फुर्त प्रतिसाद .. हल्ली मुले पुस्तकांऐवजी मोबाईलमध्ये अडकून बसल्याची पालकांची तक्रार आहे. ते खरेही आहे. स्वाभाविकच 'व्हाट्सअप यूनिवर्सिटी' मध्ये जे येते तेच ज्ञान समजून त्यांची घडणूक होत आहे. हे टाळून आपला इतिहास, संस्कृती काय; आपले राष्ट्रपुरुष, आदर्श कोण? त्यांच्या कर्तृत्व आणि कार्याचा वारसा कोवळ्या मुलांच्या मनात बिंबवण्यासाठी व त्यांना मोबाईलमधून बाहेर पडून वाचनाची गोडी लागावी याकरिता लोकमतने 'भारत रत्नमाला' नामक योजना आणली आहे. अमळनेर तालुक्यातील मारवडच्या सु. ही. मुंदडे हायस्कूल व श्रीमती द्रौ. फ.साळुंखे कनिष्ठ महाविद्यालय येथे या लोकमत भारत रत्नमाला उपक्रमानिमित्त नुकतीच भेट दिली. शिक्षक व विद्यार्थ्यांशी यानिमित्त संवाद साधता आला. या योजनेस विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत आहे.
लोकमतचे एडिटर इन चीफ मा. श्री. राजेंद्रबाबूजी दर्डा यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात शिक्षण मंत्री म्हणूनही प्रभावीपणे जबाबदारी निभावली आहे. एकूणच शिक्षणाबाबत त्यांच्या मनात असलेल्या आत्मीयता व सजगतेतून मुलांचे भविष्य घडवण्याबाबत ते नेहमीच आग्रही असतात. बाल्यावस्थेतील पिढीवर संस्कार घडवण्याबाबतची त्यांची संवेदनशीलता आमच्यासाठी प्रेरणा ठरत आली आहे. त्याच अनुषंगाने इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांकरता लोकमतमध्ये 'भारत रत्नमाला' ही विशेष मालिका सुरू करण्यात आली असून, यामध्ये भारतरत्न व पद्मविभूषण, पद्मभूषण व पद्मश्री यासारख्या सर्वोच्च नागरी सन्मान प्राप्त झालेल्या महान व्यक्तिमत्त्वांच्या कार्याची ओळख करून दिली जात आहे. ज्ञान व मनोरंजनासोबतच बक्षिसे जिंकण्याची संधीही या विद्यार्थ्यांना लाभणार आहे. यानिमित्ताने मुलांनी पुस्तकांकडे व वाचनाकडे वळावे हाच यामागील हेतू आहे. लोकमतचे उप महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी, वितरण विभागाचे उप व्यवस्थापक राजेश सूर्यवंशी यावेळी समवेत होते. मारवडचे वार्ताहर डी. व्ही. पाटील यांच्या पुढाकारामुळे हा योग घडून आला. #LokmatJalgaon #LokmatEvent #LokmarBharatRatnamala #KiranAgrawalLokmatJalgaon

No comments:

Post a Comment