Thursday, January 31, 2019

Editors view published in Online Lokmat on 31 Jan, 2019

एकलहरा ग्रामपंचायतीचे पुरोगामित्व!

किरण अग्रवाल

समाज स्वत:हून बदलत नसतो, त्याकरिता समाजधुरिणांना पुढाकार घ्यावा लागतो. हे धुरीणत्व अनेक व्यासपीठ अगर माध्यमातून पुढे येत असते. विशेषत: स्थानिक स्वराज्य संस्थांचे नेतृत्व वा प्रतिनिधित्व करणाऱ्यांकडे यासंदर्भात मोठ्या आशेने पाहिले जाते; परंतु अलीकडच्या काळात त्यांच्यातील वाढते राजकारण आणि त्याअनुषंगाने बदललेल्या त्यांच्या कामकाजाच्या प्राथमिकता पाहता समाजातील नाजुक-भावनिक प्रश्नांकडे मात्र लक्ष दिले जात नसल्याचेच आढळून येते. ते आपले काम नाही, अशीच नेतृत्वकर्त्यांची मानसिकता असते. त्यामुळे अशाही स्थितीत वैधव्य नशिबी आलेल्या गावातील भगिनींना पुनर्विवाहासाठी आर्थिक स्वरूपाची मदत करण्याचा एकलहरे ग्रामपंचायतीचा ठराव खऱ्याअर्थाने पुरोगामी राज्याची ओळख अधोरेखित करणाराच म्हणायला हवा.

विवाहविषयक समस्या आज प्रत्येकच समाजात चिंतेची बाब ठरली आहे. पूर्वी हुंड्याचा विषय यात अग्रक्रमाने येई. आता हा मुद्दा तितकासा प्रभावी राहिला नसला तरी काळानुरूप अन्य विषय पुढे आले आहेत. उच्च विद्याविभूषित होताना गाठली जाणारी वयोमर्यादा, त्यात मुला-मुलींची अनुरूप पसंती असे प्रश्न तर आहेतच; परंतु शहरातीलच काय, गावातील मुलीदेखील गावातली स्थळे नाकारताना दिसत आहेत. गावाकडे प्रापर्टी असो अगर नसो, मुलगा शहरात नोकरी-व्यवसाय करणारा हवा असाच बहुतेकांचा कल असतो. यातही एकत्रित कुटुंब पद्धतीऐवजी विभक्तपणे राहणाऱ्यांना अधिक पसंती लाभते. अशा या एकूणच परिस्थितीत दुर्दैवाने कसल्या का कारणातून होईना, एखाद्या भगिनीच्या वाट्याला वैधव्य आले तर एकटेपणाचे तिचे जिणे असह्य ठरल्याखेरीज राहात नाही. कौटुंबिक पातळीवरील उपेक्षा वा दुर्लक्षाला तर तिला समोरे जावे लागतेच; परंतु सामाजिकदृष्ट्या गैरफायदा घेऊ पाहणाऱ्यांच्या नजराही तिला टोचल्याखेरीज राहात नाही. या पार्श्वभूमीवर गावाचे नेतृत्व करणाऱ्या एखाद्या ग्रामपंचायतीने रस्ते, गटारी व दिवाबत्ती आदी कामांच्या पारंपरिक चौकटीपलीकडे पाऊल टाकून विधवांसाठी आर्थिक मदतीचा विचार करावा, हे कौतुकास्पद व इतरांसाठी अनुकरणीयच आहे.



नाशिक जिल्ह्यातील एकलहरे ग्रामपंचायतीने प्रजासत्ताकदिनी झालेल्या ग्रामसभेत एक ठराव करून, पुनर्विवाह करू इच्छिणाऱ्या विधवांना विवाहाकरिता ग्रामपंचायतीकडून २५ हजारांची आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. आपण पुरोगामी राज्याची ओळख सांगतो, विधवांचे पुनर्विवाह घडवून आणून त्यांना पुन्हा सन्मानाने जगण्याचा अधिकार प्राप्त करून देण्यासाठी झटलेल्या राजा राममोहन रॉय, छत्रपती शाहू महाराज व महात्मा जोतिबा फुले यांच्यासारख्या समाजधुरिणांचा वारसा सांगतो; पण त्यांचे विचार खरेच अमलात आणतो का, हा प्रश्नच असताना एकलहरा ग्रामपंचायतीने मात्र सामाजिक जाणीव व कर्तव्यभावनेतून ऐतिहासिक ठरावा असा ठराव केला आहे. अर्थात, या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मोहिनी जाधव या महिला सरपंच असल्याने व महिलेचे दु:ख अगर वेदना महिलेशिवाय कुणाला अधिक कळणार, या न्यायाने त्यांनी या विषयाकडे लक्ष पुरविले असावे; पण त्यांच्या या विचाराला सर्व सहकारी ग्रामपंचायत सदस्यांनी व गावकऱ्यांनीही एकमुखी पाठिंबा दिल्याचे पाहता एका छोट्या गावातून पुरोगामित्वाची मशाल पेटून गेल्याचे म्हणता यावे.

पंचायतराज व्यवस्थेत गावकारभारी सक्षम होणे अपेक्षित आहेच; परंतु विकासाचा गावगाडा हाकताना सामाजिक जाणिवेचे कर्तव्यभान बाळगले गेले तर अबोल ठरणाऱ्या वेदनेवर फुंकर घालण्याचे काम कसे घडून येऊ शकते याचा प्रत्ययच यानिमित्ताने एकलहरेवासीयांनी आणून दिला आहे. महिला व बालकल्याणाच्या योजना आखताना किंवा त्यासाठीचे प्रस्ताव देताना चौकटी ओलांडून असे मूलभूत मानसिक परिवर्तनाचे विचार केले गेले तर त्याद्वारे काळ्या पाटीवर पांढरी फुले रेखाटली गेलेली दिसून येतील. मागे नाशिक जिल्ह्यातीलच येवला तालुक्यात गावातील घराघरांवर मुलींच्या नावाच्या पाट्या लावण्यात आल्या होत्या. त्यातून मुला-मुलींमध्ये भेद न करता लिंग समानतेचा संदेश दिला गेला. त्यानंतर आता एकलहरे ग्रामपंचायतीने विधवांच्या पुनर्विवाहासाठी आर्थिक मदतीचा ठराव करून त्यापुढचे पाऊल टाकले आहे. आजच्या कौटुंबिक व सामाजिक विसंवादी तसेच विभक्त व्यवस्थेत गावक-यांचे, समाजाचे अशा रितीने मानसिक उन्नयन घडवून आणणाऱ्या या सर्व संबंधितांचे म्हणूनच कौतुक करावे तितके कमी आहे.


Web Title: editorial view on eklahare gram panchayat nashik

Monday, January 28, 2019

Blog / Article publisheb in Online Lokmat on 26 Jan, 2019

सामान्यांची गुदमर कुणा कळेना !

किरण अग्रवाल

प्रजासत्ताकाचा ७०वा वर्धापनदिन साजरा करून तो वर्धिष्णू होत राहण्याची कामना एकीकडे करत असताना व ‘जन गण मन अधिनायक जय हे’चे विजयगान गात असतानाच देशातील पन्नास टक्के संपत्ती फक्त नऊ अब्जाधीशांकडे एकवटली असल्याचे वृत्त समोर आले आहे. ‘आहेरे’ व ‘नाहीरे’ वर्गातील वाढती दरी यातून स्पष्ट होणारी असून, पैशाकडेच पैसा जात असल्याचा अनुभव अगर समजाला त्यातून बळकटीच मिळून गेली आहे. विशेष, म्हणजे श्रीमंतांच्या यादीत भर पडत असताना रोजीरोटीसाठी रोजचाच झगडा वाट्यास आलेल्या तळाच्या वर्गाची घुसमट व त्यांचा रोखला जाणारा श्वास काही कुणाच्या स्वारस्याचा विषय बनताना दिसत नाही ही बाब चिंताजनक तर आहेच, शिवाय ती चिंतनयोग्यही ठरावी; कारण ही असमानता उत्तरोत्तर वाढत राहिली तर त्यातून प्रजासत्ताकामागील प्रेरणांनाच धक्के बसल्याखेरीज राहणार नाहीत.

भूतकाळात ‘गरिबी हटाव’चे तर वर्तमानात ‘अच्छे दिन’चे नारे ऐकायला मिळाले असले तरी, कुणाची गरिबी हटली व कुणाला अच्छे दिन आलेत हे काही कुणापासून लपून राहिलेले नाही. स्वातंत्र्योत्तर सात दशकांच्या वाटचालीत आपण आपली लोकशाही व्यवस्था अधिक बळकट केली खरी; पण प्रजासत्ताकातील समता, ममता, बंधुतेच्या, तसेच अभिव्यक्तीच्या घटनादत्त प्रेरणा मात्र क्षीण झाल्याचेच दिसून येते. समतेच्याच बाबतीत विचार केला तर, स्री-पुरुष समानतेत काहीअंशी यश लाभते आहे; परंतु सामाजिक, धार्मिक व आर्थिक पातळीवरील समता साकारण्यात नित्य नव्या आव्हानांचे अडथळेच आड येताना दिसत आहेत. यात आर्थिक असमतोलाचे रुंदीकरण किती वेगाने होत आहे हे ‘आॅक्सफॅम’ने नुकत्याच घोषित केलेल्या अहवालावरून स्पष्ट व्हावे. भारतातील अब्जाधीशांची संपत्ती २०१८मध्ये प्रतिदिनी २,२०० कोटींनी वाढत असताना देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी १० टक्के, म्हणजे १३.६ कोटी लोक २००४ पासून सातत्याने कर्जात बुडालेले असल्याचे हा अहवाल सांगतो; यावरून समाजातील टोकाच्या होत चाललेल्या आर्थिक विषमतेची जाणीव व्हावी. कुणाला आले ‘अच्छे दिन’, असा प्रश्न त्यामुळेच उपस्थित व्हावा.



अर्थात, श्रीमंत अधिक श्रीमंतीकडे वाटचाल करीत असून, गरीब अधिकच गरिबीत लोटला जात असल्याची बाब अधोरेखित व्हावी असे निष्कर्ष ‘आॅक्सफॅम’च्या अहवालात नमूद असल्याने ‘अच्छे दिन’ आलेल्यांचा वर्ग उघड होऊन गेला आहे. भारतातील एक टक्का अतिश्रीमंतांची संपत्ती वर्षभरात तब्बल ३९ टक्क्यांनी वाढली असताना अर्ध्या लोकसंख्येच्या संपत्तीत अवघी तीन टक्क्यांची नाममात्र वाढ झाली आहे. जागतिक पातळीवरचा एकुणात विचार केला तर तळाच्या अर्ध्या लोकसंख्येची संपत्ती वाढण्याऐवजी ११ टक्क्यांनी कमीच झाली आहे. ही विषमता केवळ या अहवालावरूनच निदर्शनास येते असे नाही, तर १४ हजार कोटींचा गफला करणारे नीरव मोदी व मेहुल चोकसी आणि विविध बँकांचे सुमारे नऊ हजार कोटी रुपये बुडवणारे विजय मल्ल्या यांच्यासारखे कर्जबुडवे परदेशी पळून जात असताना हजार-दोन हजारच्या ठेवी परत मिळवण्याकरिता हजारो सामान्य ठेवीदारांना मात्र बँकांच्या अगर पतसंस्थांच्या दाराशी धरणे धरीत बसावे लागते, यातूनही ती उजागर होऊन जाते. त्यामुळे घेणेकरी फरार व देणेकरी रस्त्यावर; हीच आपल्याकडील आर्थिक विषमतेची सच्चाई म्हणता यावी.

एकीकडे पंचपक्वानांच्या भोजनावळी उठून ‘उतनाही लो थाली मे, जो व्यर्थ न जाये नाली मे’ असे आवाहन करण्याची वेळ आली असताना, दुसरीकडे आश्रमशाळांमधील निवासी विद्यार्थ्यांना चांगल्या व पुरेशा जेवणासाठी आजही संघर्ष करायची वेळ येते, हे कोणत्या समानतेचे लक्षण म्हणायचे? ‘जन गण मन अधिनायक जय हे’चा अभिमानाने जयघोष करीत असताना या जन व गणांतील सामान्यांच्या पायांना आलेले फोड, डोळ्यात तरळणारे अश्रू व अंगाला आलेला घाम इतरांना दिसणार नसेल किंवा ‘अच्छे दिन’ आपल्याच वाट्याला खेचून घेऊ पाहणाऱ्यांच्या गळेकापू स्पर्धेत गुदमरणारा गरिबांचा श्वास जाणवणार नसेल तर या वर्गाच्या अधिनायकांचे जय हो, म्हणण्याला अर्थ तरी काय उरावा?  

Thursday, January 24, 2019

Editors view published in Online Lokmat on 24 Jan, 2019

भाऊ-दादांची खिचडी !

किरण अग्रवाल

भिन्न पक्षीयांचे राजकारणेतर मैत्रीचे संबंध असू नयेत, असे कुणीही म्हणणार नाही. किंबहुना अनेकांनी तसे ते जपल्याची उदाहरणेही आहेत. परंतु अशा संबंधांची कसलीही पार्श्वभूमी नसताना आणि राजकीयदृष्ट्यादेखील आरोपांचे अगर वाद-विवादांचे मळभ दाटलेले असताना सहज म्हणून कुणाच्या भेटी घडून आल्या तर सामान्यांच्या भुवया उंचावणे स्वाभाविकच ठरते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार व भाजपा नेते गिरीश महाजन यांची नाशिक मुक्कामी झालेली भेट त्यामुळेच चर्चेचा आणि उत्सुकतेचा विषय बनून गेली आहे.

उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे येथील महानगरपालिकांसह विविध स्थानिक निवडणुकांमध्ये भाजपाला लाभलेल्या यशाचे श्रेय राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे नेतृत्व व त्यांच्या व्यूहरचनेला दिले जाते. खान्देशातील बडे प्रस्थ म्हणाविणाऱ्या एकनाथ खडसे यांचे पक्षांतर्गत खच्चीकरण केले गेल्यानंतर महाजन यांचे भाजपातील वजन अधिक वाढले. स्थानिक यशाखेरीज राज्यातील ठिकठिकाणच्या बिकट परिस्थितीत ते पक्षासाठी ‘संकटमोचका’ची भूमिकाही पार पाडीत असतात. या साºया पार्श्वभूमीवर खान्देशातील यशानंतर बारामतीतही नगरपालिका जिंकून दाखवू, असे विधान त्यांनी केल्याने निर्धार परिवर्तन यात्रा करणारे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी खान्देशातीलच चाळीसगाव येथील सभेत बोलताना महाजन यांना बारामतीत येऊन दाखविण्याचे आव्हान दिले होते. त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील एका कार्यक्रमानिमित्त आले असता, पक्षाने सांगितल्यास बारामतीतही चमत्कार करून दाखविण्याचा पुनउच्चार महाजन यांनी केला. एकीकडे उभय नेत्यांमध्ये अशी आव्हान-प्रतिआव्हानाची खडाखडी सुरू असताना याच दरम्यान, या दोघांची नाशिक मुक्कामी भेट घडून आल्याने त्याबद्दल चर्चा झडणे क्रमप्राप्त ठरले आहे.



खरे तर अजित पवार व गिरीश महाजन हे दोघेही नेते एकाचवेळी नाशकातील शासकीय विश्रामगृहावर थांबलेले असल्याने त्यांची भेट होणे यात अचंबित होण्यासारखे काही ठरले नसते, कारण विधिमंडळ अधिवेशनादरम्यानही असे भिन्नपक्षीय नेते समारोसमोर येतात व हास्यविनोद करून ते आपापल्या मार्गाला लागलेले पाहावयास मिळतात. पण येथे पहाटे पहाटे महाजन हे अजित पवार यांच्या कक्षात गेलेले व तेथील कार्यकर्त्यांपासून काहीसे बाजूला होत उभय नेत्यांनी गुफ्तगू केलेले उपस्थितांना पाहावयास मिळाले. अनायासे झालेल्या भेटीत औपचारिक चर्चा करून वेळ निभावलेली पाहावयास मिळणे वेगळे व सोबत असलेल्या भाजपाच्या स्थानिक महापौर, आमदार आणि राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष आदींकडे पाठ करून दोन मिनिटे खासगीत बोलणे वेगळे; उभयतांत अवघ्या काही मिनिटात ही कसली खिचडी शिजली असावी, असा प्रश्न म्हणूनच उपस्थित होऊन तो औत्सुक्याचाही ठरून गेला आहे.

विशेषत: बारामतीत जाऊन जिंकून दाखविण्याचे व त्यासाठी त्यांना येऊनच दाखवा, असे आव्हान-प्रतिआव्हान एकीकडे दिले जात असताना, दुसरीकडे भाऊ व दादांमध्ये ही खासगी गुफ्तगू घडून आली, त्यामुळे त्याबाबतचे औत्सुक्य आहे. नाशकात महापालिका भाजपाच्या ताब्यात असून, शहरातील तीनही आमदारदेखील भाजपाचे आहेत. विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस इतर पक्षांच्या तुलनेत प्रबळ आहे. शिवाय, भुजबळच त्या पक्षातील कर्ते-करविते आहेत. त्यामुळे भाजपा व राष्ट्रवादी यांच्यात होऊ घातलेली भविष्यकालीन निवडणुकीच्या रणांगणातील स्पर्धा पाहता कुणी, कुणाला, कसला सल्ला याभेटीत दिला असेल की सबुरीने घ्यायचे सांगितले असेल; हे ते दोन्ही नेतेच जाणोत, मात्र बाहेर जाहीर सभांमध्ये परस्पर विरोधाचे डंके पिटणारे नेतेच खासगीत असे सलगीने वागून अराजकीय मैत्रीधर्म निभावताना दिसतात म्हटल्यावर, आपण तरी का आपसात डोकेफोड करावी, असा प्रश्न सामान्य कार्यकर्त्यांना पडला तर तो गैर कसा ठरावा?  

Monday, January 21, 2019

Prayagraj Kumbh news in Online Lokmat on 14 Jan, 2019

दिगंबर आखाड्यात लागली आग, मंडप अन् भक्तनिवास आगीच्या भक्ष्यस्थानी

अलाहाबाद- प्रयागराजच्या कुंभमेळ्यातील सेक्टर 16 मध्ये असलेल्या वैष्णव पंथीय दिगंबर आखाड्यात 2 गॅस सिलिंडर्सचा स्फोट झाल्याने आग लागली असून, अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहोचले आहेत. आज सकाळपासूनच हलक्याशा वादळाची चाहूल होती, त्यामुळे आग फैलावली आणि आखाडा मंडप व संत, भक्त निवास आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. सुदैवाने जीवितहानी टळली.



अग्निशमन बंब तातडीने पोहोचल्याने आगीवर नियंत्रण मिळवता आले. लगतच्या आखाड्यांनीही धाव घेऊन मदत केली. सर्व सुखरूप असल्याचे महंत भक्तीचरणदास यांनी सांगितले. दरम्यान अग्निशामक बंब उशिरा आल्याचा आरोप करीत साधू वर्गानं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. लाकडे, बांबू व गवताने निवासासाठीच्या राहुट्या उभारलेल्या असल्याने व वाऱ्यामुळे आग पसरली. उच्चधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, संत व भाविकांच्या रोषाचा करावा लागतो आहे.

दिगंबर आखाड्यात चित्रकूट, उज्जैन व वृंदावनच्या बैठकी आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहेत. तसेच 2 कारनं पेट घेतला आहे. त्याशेजारील गॅसवर चालणारे वाहन 2 मिनिटांपूर्वी बाहेर पडलेले होते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. आग लागताच आखाड्यातील सर्व वाहने कंपाउंड तोडून बाहेर काढण्यात आलीत व अन्य राहुटयातील गॅस सिलेंडर्स बाहेर फेकण्यात आले, त्यामुळेही पुढील अनर्थ टळला.

Web Title: kumbh heavy fire at digambar akahada tents in prayagraj

Prayagraj Kumbh news in Online Lokmat on 15 Jan, 2019

पहिल्या शाहीस्नानासाठी आखाड्यांचं प्रस्थान

थेट प्रयागराज येथून किरण अग्रवाल

प्रयागराज: त्रिशूळ, गदा, तलवारी नाचवत व डमरू वाजवत कुंभमेळ्यातील मकरसंक्रांतीच्या पहिल्या शाही स्नानासाठी संत महंतांच्या शोभा यात्रांना प्रारंभ झाला असून, कडाक्याच्या थंडीत धार्मिक आस्थेची उब उरी बाळगणारे लाखो भक्त पवित्र स्नानासाठी त्रिवेणी संगमावर पोहोचले आहेत.

आखाडा परिषदेच्या शिरस्त्याप्रमाणे व परंपरेनुसार पहाटे 5.15 वाजता महानिर्वाणी व अटल आखाड्याने संगमाकडे प्रस्थान ठेवले तर 5.45 वाजता निरंजनी व आनंद आखाड्याची शोभायात्रा प्रारंभ झाली आहे. महानिर्वाणीचे आचार्य विश्वत्मानंद सरस्वती, स्वामी वासुदेवानंद सरस्वती आदी महामंडलेश्वर रथावर आहेत.



निरंजनीचे महंत नरेंद्र गिरी, आनंद पिठाधिश्वर स्वामी बालकानंद गिरी व त्यांच्या पाठीमागे सोमेश्वरानंद गिरी, परमानंद गिरी, कालच महामंडलेश्वर म्हणून पट्टाभिषेक झालेल्या केंद्रीय राज्यमंत्री निरंजना ज्योती, विष्णुचैतन्य गिरी, गुरू माँ आनंदमयी, विद्यानंद गिरी, महेशानंद गिरी, सत्यानंद गिरी आदींचे फुलांनी सुसजजीत रथ आहेत. आखड्यांच्या इष्ट देवतांच्या पालख्या व धर्मध्वज अग्रभागी आहेत.

गंगा, यमुना व सरस्वतीच्या संगमावर कुंभ स्नान होत असून स्नानास जाणाऱ्या संत महंतांचं दर्शन व आशिर्वादासाठी रस्त्याच्या दुतर्फा भक्तांची मोठी गर्दी झाली आहे. कुंभासाठी सोडलेल्या खास रेल्वे, एसटी व खासगी वाहनांद्वारे लाखो भाविक प्रयागराजला पोहोचत आहेत. संगमाकडे जाणाऱ्या सर्वच मार्गांवर कालपासूनच वाहनांना प्रवेशबंदी करण्यात येऊन वाहनं शहराबाहेर रोखली गेल्याने भाविकांना सुमारे 10 ते 12 किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला असून संगम तटावर सुरक्षा रक्षक तैनात आहेत. ड्रोन कमेऱ्याद्वारे शाही मिरवणूक मार्गावर नजर ठेवली जात आहे. दुपारी 4 वाजेपर्यंत विविध आखड्यांचं शाही स्नान चालणार आहे. शैव पंथीयांचे 10 तर वैष्णवांचे 3 असे एकूण 13 आखाडे व त्यांच्या अंतर्गत असलेले खालसे यात सहभागी झाले आहेत.

Web Title: Kumbh 2019 Starts With First Shahi Snan Today

Prayagraj Kumbh news in Online Lokmat on 15 Jan, 2019

केंद्रीय मंत्री असताना महामंडलेश्वर बनणाऱ्या निरंजन ज्योती पहिल्याच मंत्री

किरण अग्रवाल

ठळक मुद्दे
केंद्रीय मंत्री असताना महामंडलेश्वर बनणाऱ्या निरंजन ज्योती पहिल्याच मंत्री आहेत.
पट्टाभिषेकापूर्वी बोलताना राम मंदिर लवकरच पूर्ण होईल अशी भावना निरंजन ज्योती यांनी व्यक्त केली आहे.
धर्म व राजकारण या सेवेसाठी एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचेही  त्यांनी सांगितले.

प्रयागराज - केंद्रीय राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती  पंचायती निरंजनी आखाड्याच्या महामंडलेश्वर पट्टाभिषेकसाठी आनंद पिठाधिश्वर स्वामी बालकानंद गिरी समवेत आखाड्यात दाखल झाल्या आहेत. आखाडा परिषद अध्यक्ष महंत नरेंद्र गिरीसह अनेक संत उपस्थित आहेत. केंद्रीय मंत्री असताना महामंडलेश्वर बनणाऱ्या निरंजन ज्योती पहिल्याच मंत्री आहेत. पट्टाभिषेकापूर्वी राम मंदिर लवकरच पूर्ण होईल अशी भावना निरंजन ज्योती यांनी व्यक्त केली आहे. धर्म व राजकारण या सेवेसाठी एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचेही  त्यांनी सांगितले. गुरुदेव परमानंद गिरी जी देखील दाखल झाले आहेत. आखाडे देखील व्यक्तित्व निर्मितीचे केंद्र असल्याचे व सनातन धर्म बळकट करण्याच काम त्याद्वारे होत असल्याचे स्वामी बालकानंद गिरी यांनी यावेळी बोलताना सांगितले.



मंत्र जप व नमो पार्वती पतेच्या घोषात पट्टाभिषेक प्रक्रिया पूर्ण झाली. आखाडा नेहमी महिलांचा सन्मान करीत आल्याचे सांगत निरंजनी आखाडा, आनंद आखाडा, महानिर्वानी, अटल, अग्नी, जुना उदासीन, निर्मल आदी आखड्यातर्फे विविध महंतांहस्ते चादर पांघरून साध्वी निरंजन ज्योतींचा सन्मान करण्यात आला. आखाडा परिषद सचिव महंत हरीगिरीजी, गजाचरणजी (गुजरात), मा नंदाकिनी जी, आत्मचेततनानंद जी, आशुतोषानंद गिरी (काशी),  अनंत देवगिरीजी, प्रेमानंद महाराज, गजानंदगिरी जी, आदित्य गिरी (गुजरात), हरिओम गिरी, मंजू श्री जी ( नोएडा), प्रशांत गिरी (पटियाला), आदी संताची मोठी उपस्थिती होती. मात्र राजकीय नेते या कार्यक्रमापासून दूर होते.

कुंभमेळ्याच्या पवित्र स्नानासाठी प्रयागराज तीर्थ येथे देश-विदेशातून हजारो भाविक दाखल झाले असून मकर संक्रांतीच्या दिनी 15 जानेवारी रोजी पहिले शाही स्नान होणार आहे त्यासाठी अलाहाबाद नगरी सज्ज झाली आहे. प्रयागराजच्या त्रिवेणी संगमावर सुमारे 45 एकर क्षेत्रामध्ये साधुग्राम म्हणून अस्थायी शहर वसविण्यात आले असून त्यात विविध आखाडे व त्यांच्या महंत तसेच महामंडलेश्वर यांच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी होत आहे. साधुग्राममध्ये जाण्यासाठी नदीच्या पाण्यावर तरंगणाऱ्या लोखंडी ड्रमसवर 24 तात्पुरते पूल उभारण्यात आले आहेत. सर्वच आखाड्यांमध्ये भाविकांसाठी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून अहोरात्र भंडाराही सुरू आहे, महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे हभप रामकृष्ण लहवीतकर महाराज व त्यांचे अनुयायीही शाही स्नानात सहभागी होणार आहेत. 

कुंभमेळ्यासाठी अवघी प्रयागराज नगरी सजली असून जागोजागी स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. सरकारी इमारतींवर तसेच शहरातील पुलांवर व चौकांवर कुंभशी निगडित धार्मिक चित्रे चितारण्यात आली आहेत. उत्तर प्रदेश सरकारनेही गेल्या दीड वर्षात केलेल्या कामगिरीचे फलक जागोजागी लावले आहेत.