Thursday, November 13, 2025

आनंदाचे डोही आनंद तरंग...

22 Oct, 2025 आनंदाचे डोही आनंद तरंग...
दिवाळीच्या प्रकाश पर्वात सारे वातावरण सप्तरंगात न्हाऊन निघाले आहे. सर्वत्र आनंदाची व मांगल्याची बरसात होते आहे. लख्ख उजेड उधळणाऱ्या दिव्यांनी परिसर उजळून निघाला आहे... घरात लक्ष्मीपूजन आटोपल्यावर लगतचे मित्र व ज्येष्ठांच्या भेटी व त्यांचे आशीर्वाद घेऊन गच्चीवर गेलो, आकाशात फुटणाऱ्या फटाक्यांमुळे होणारा रंगोत्सव बघायला... **** पाठोपाठ धाकटी कन्या कृतिका सोबत सौ.ही आली. काहीशी शांत, निवांत होती. विचारले, एवढा उत्साहाचा हा उत्सव; तुला काय झाले? म्हटली, आज श्रुती येथे नाही... लग्नानंतरची तिची पहिली दिवाळी. तिच्या सासरी ती आहे. मनात कालवाकालव जरूर झाली, कारण गेल्या 28 वर्षात फक्त एकदाच, ती नोकरीला लागल्याच्या पहिल्या वर्षी सुटी न मिळाल्याने पुण्यात अडकली होती; म्हणून दिवाळीला सोबत नव्हती. तेवढा अपवाद वगळता कायम ती सोबत असे. पण आता तर यापुढे असेच होणार. लग्न झालेय तिचे. म्हटले, अरे आपल्या पणतीने आपण तिच्या सासरचे अंगण उजळले; हा किती मोठा आनंद! नाते संबंधाची नवी चादर शिवून मायेची मधुर उब तिला लाभलीय.. आयुष्याचा सहचर आणि आणखी एका मम्मी पप्पांच्या, दिदीच्या सहवासाने तिच आयुष्यच सुगंधी झालंय... आमच्या या दिवाळीलाही लाभलाय तिचा तो सुगंधी दरवळ. ****
हे खरं, की ती असायची तर.., असू द्या, खूप आठवणी आहेत. जागा नाही पुरणार लिहायला. वेळ नाही तितका... आमच्या वेलीवर आलेली ती एक चिमणी, भुर्रकन उडून गेली नव्या कुटुंब कबिल्यात. लेकीचं असंच असतं, इतका जीव लावलेला असतो त्यांनी आपल्याला.. कधी आईसारखा, कधी बहिणीसारखा, प्रसंगी मैत्रिणीसारखा; की त्यांचं घरातलं असणं एखाद्या अत्तरासारखं बनून जातं. सासरीच काय, लग्नापूर्वी ती नोकरीसाठी म्हणून घर सोडून पुण्यात गेली होती तर घर कसं रीतं रित वाटे आताच्या या रितेपणात मात्र एक भरलेपण आहे, कारण पंखात बळ आलेली चिमण पाखरं आपला खोपा विणतातच ना.. तिलाही लाभला असाच खोपा अन एक जोडीदार चिमणा. कसं असतं ना आयुष्य, बदलते प्रसंग आणि परिस्थितीच्या हिंदोळ्यावर झुलणारं.. त्यातच तर आहेत भाव भावनांचे सप्तरंग अन आठवणींचे कल्लोळ ****
आकाशातही फटाक्यांचा कल्लोळ उठला आहे, रंग उधळले जात आहेत, पण या गजबजाटात आम्ही कुठे तरी हरवून बसलो होतो स्वतःला. एवढ्यात व्हिडिओ कॉलची बेल वाजली... कॉल एक्सेप्ट करताच एका सुरात नाद गुंजला... हॅप्पी दिवाली ! श्रुती, जावई तुषार, चंचल, व्याही - विहिण बाई सारे कुटुंब स्क्रीनवर होते... त्यांच्याकडे यंदा साक्षात लक्ष्मी आल्याचा भाव आणि आनंद त्यांच्या बोलण्यात ओसंडून वाहताना दिसला. सारे घर आनंदात न्हाऊन निघालेले... आणखी काय हवे, कुणाही लेकीच्या बापाला आणि कुटुंबाला? त्या आनंदाच्या प्रकाश प्रवाहात आम्हीही डुंबतो, वाहतो आहोत आता... #KiranAgrawal #HappyDipawli #ShruTu.

No comments:

Post a Comment