Wednesday, November 12, 2025

London Tour 4

दगडी शिल्पांचा जागतिक वारसा...
इंग्लंडच्या विल्टशायरमध्ये अजस्त्र अश्या दगडांची वर्तुळाकार मांडणी केलेले प्रागैतिहासिक स्मारक आहे, ज्याचे नाव स्टोनहेंज. UK लंडनमध्ये गेलेले पर्यटक युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश केलेल्या या स्टोनहेंजला आवर्जून भेट देतात म्हणून आम्हीही ते बघायला गेलो. नवाश्मयुगीन काळातील 2 ते तब्बल 25 टन वजनांचे सुमारे 10/10 मीटर व्यासाचे अवाढव्य दगड येथे वर्तुळाकार व अद्वितीय पद्धतीने रचून ठेवण्यात आले आहेत. तब्बल दीड हजार वर्षात टप्प्याटप्प्याने ही मांडणी केली गेल्याचे सांगितले जाते. ई.स. पूर्व 3000 मध्ये म्हणजे सुमारे 5000 वर्षांपूर्वी सूर्याच्या रेषेत हे शिल्प बनवले गेले असल्याचा पुरातत्व शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. मात्र ते नेमके कुणी व कशासाठी बनविले असावे, हे अजून अस्पष्ट आहे. संशोधकांचे वेगवेगळे दावे त्याबाबत आहेत. महत्त्वाचे म्हणजे, दळणवळणाची कुठलीही सुविधा किंवा 'क्रेन'सारखी प्रगत साधने उपलब्ध नसताना त्याकाळी एवढे प्रचंड मोठे दगड या 'सॅलीसबरी'च्या पठारावर कसे आणले गेले असतील आणि विशिष्ट पद्धतीने कसे रचले गेले असावेत याचेच मोठे कुतूहल हे बघताना जाणवते. त्याचे वेगवेगळे तर्क येथे दिले जातात, ते ऐकून व डोकं खाजवूनही ते काम करत नसल्याने आम्हीही विस्मयकारकपणेच येथून बाहेर पडलो ... #LokmatGlobalEconomicConventionLondon2025 #KiranAgrawal #LondonTour #KATourDiary #Stonehenge

No comments:

Post a Comment