Wednesday, November 12, 2025

मुली पटपट मोठ्या होतात आणि रडवून जातात...

13 May 2025 मुली पटपट मोठ्या होतात आणि रडवून जातात...
आमच्या श्रुतीचंही तसच झालं. इवली इवलीशी श्रुती कधी मोठ्ठी झाली ते कळलच नाही. बेताच्या आमच्या परिस्थितीत तिनं कधी कशासाठी हट्ट केल्याचं आठवत नाही. आईच्या ओढणीची साडी करून नेसणारी व हौस भागवणारी ही पोर. ती लहान होती तेव्हा शासनाच्या हॅन्डलूम क्राफ्ट प्रदर्शनात आलेल्या व स्नेह जुळलेल्या लखनऊ येथील लल्ला भैय्याने तिला खास मातीची एक डोली खेळायला दिली होती. तिनं ती जपून ठेवली. त्या डोलीसोबत खेळतच तिनं स्वप्न बघितलं आणि अखेर तिच्या स्वप्नातील राजकुमार डोली घेऊन आला व त्यात बसून ती नव्या प्रवासाला निघाली. हसत हसत आणि रडत रडतही. रडणं यासाठी, की माझ्यात तर तिचा खूपच जीव. मला आठवतं, नाशिकवरून माझी अकोल्यात बदली झाली तेव्हा आयुष्यात पहिल्यांदा तब्बल महिनाभर तिला सोडून राहिलो होतो. नंतर घरी आलो तर दारातच अशी बिलगली की किती तरी वेळ बिलगूनच राहिली. सकाळी भल्या पहाटे मी येईन म्हणून रात्रभर जागत बसून होती म्हणे खिडकीजवळ. एका बापाची, म्हणजे माझी खास मैत्रीण, बहीण, आई असे अनेकविध रोल निभावणारी पोरगी.. घराला आणि मनालाही रीतं करून गेली, पण या रितेपणातही एक आनंद, जबाबदारीच्या मुक्तीचं भरलेपण आहे हेही खरं. पोरींचं सासरी जाणं व्याकुळ करून जातं खरं, पण यासमयीच्या आनंद अश्रूंच्या निथळण्याला आशीर्वादाचे सुस्कारे लाभलेले असतात. अशा वेळी मन गातं, बाबूल की दुवाये लेती जा... Kiran Agrawal
#ShruTu #ShrutuWedding #AgrawalGadodiya #ShrutiTushar

No comments:

Post a Comment