Wednesday, November 12, 2025

आठवणी सरता सरेनात...

01 August 2025 आठवणी सरता सरेनात...
आज बरोबर तीन महिने होत आहेत, लेकीचे म्हणजे आमच्या श्रुतीचे हात पिवळे करून. तिच्याशी आणि तिच्या लग्न कार्याशी संबंधित आठवणींचा सुगंध अजूनही दरवळतो आहे. श्रावण सरींनी निसर्गात हर्ष दाटला आहे, तसा तो मन व्यापून आहे... अशीच एक बाब आठवणीत राहण्यासारखी... त्याचे झाले असे, की लग्नात कोणत्या कार्यक्रमात कोणते कपडे परिधान करायचे हे ठरलेलं होतं. अश्यात माझं कबर्ड धुंडाळताना पुतण्या डॉ. आदर्शच्या नजरेत माझा एक जुना थ्री पीस पडला. तो होता माझ्या लग्नातला, म्हणजे तब्बल 30 वर्ष जुना. माझ्या लग्नानंतर मेहुणीच्या व भाच्यांच्या, म्हणजे फार फार तर दोन-तीनदाच तो वापरला गेला असेल. नंतर राहिला कपाटातच पडून. त्याला निकाली काढायचीही मनाची तयारी झाली नाही आजवर कधी. लग्नाच्या साऱ्या बारीक-सारीक गोष्टी जपून ठेवण्याची सवय असतेच सर्वांना. अशा चीज वस्तूंना भावनेचे काठपदर असतात, गंध असतो वेगळा. त्यामुळे अडगळीत, पण जपून ठेवलेला होता हा सूट. मी म्हटले, जुना झालाय तो. पण कोणी ऐकलं नाही. म्हणाले, त्याचीच फॅशन आता पुन्हा आलीय. आताच्या सर्वांच्या ब्लेझर्सपेक्षा वेगळं वाटेल. पत्रकारितेत इतरांपेक्षा वेगळी बातमी देण्याची सवय असल्याने मलाही ते पटलं. आश्चर्य म्हणजे तो पूर्वीसारखाच मापात बसला आणि लगेच ड्रायक्लीनला पाठवला गेला. संगीत संध्येच्या कार्यक्रमात हाच सूट वापरला. माझ्या लग्नाचा कोट मी मुलीच्या लग्नातही वापरला, आणि जुन्या आठवणींना नवे संदर्भ लाभुन मन आणखी सुगंधित होऊन गेलं. 'त्या' आठवणींचा या आठवणींशी उत्कट मिलाफ ! स्मृतिपटलावर चिरंतन रेंगाळणारा... काळ बदलला, ठिकाण व पात्रे बदलली; पण प्रसंग व भावना त्याच आणि तशाच. गोष्ट तशी इवलीशी, पण ढीगभर आनंद देणारी ठरली. शिवाय, 30 वर्षे झालीत तरी आपलं 'माप' तसंच; याचं समाधान वेगळं. जूनं ते सोनं... हेच खरं! संलग्न: 'त्या' सूट मधील तेव्हाची व आताची छबी. #ShruTu #ShrutuWedding #AgrawalGadodiya #ShrutiTushar

No comments:

Post a Comment