Tuesday, January 2, 2024

Vietnam Tour Diary 2

Dec, 2023 दुचाकीची गर्दी, हिंदी गाणी आणि आदरातिथ्य ... 'या' देशात परकेपण वाटतच नाही!
किरण अग्रवाल / आग्नेय आशियातील व्हिएतनाम हा देश शीतयुद्धाच्या जखमा बाजूस सारून 'फिनिक्स'प्रमाणे भरारी घेत पर्यटकीय नकाशावर आला आहे. भारताशी सांस्कृतिक व व्यावसायिक साम्य असलेल्या या देशात 90% वाहतूक दुचाकीवर होताना दिसते. पण हे सारे दुचाकीस्वार हेल्मेट घालून शिस्तीत वाहन चालविताना दिसतात. पर्यटक म्हणून आपण दुचाकी राईड घेतली तर चालक आपल्यासाठीही एक्स्ट्रा हेल्मेट घेऊनच येत असल्याचा अनुभव आम्ही घेतला. रात्री रस्ते सुनसान झालेले असले तरी सिग्नल टाळून कोणी गाडी दामटत नाही. विशेष म्हणजे सिग्नलवर पोलीस नसतानाही अशी शिस्त पाळली जाते. -------------------- खाण्यात सी फूड्स अधिक वापरले जात असलेत तरी, भारतीय फळे व भाजीपालाही मुबलक प्रमाणात मिळतो. तो मीठ - मिरची न वापरता उकळून खाऊ घातला जातो इतकेच, पण उपासमार होत नाही. असे खाणे असल्यामुळेच तेथील लोक अगदी तुकतुकीत दिसतात. पोटाखाली पॅन्ट सरकलेले गुबगुबीत फक्त भारतीय पर्यटक आढळतात. तेथील तुलनेने छोट्या व स्लीक इलेक्ट्रिक बाइक्सवर बसून फिरताना मग अशांना मोठी कसरत करावी लागत असल्याचे बघून हसू आवरत नाही. जीवन व आचार पद्धतीत बौद्ध धर्माचे अनुसरण तेथे मोठ्या प्रमाणात आहे. जागोजागी भगवान बुद्धांच्या मोठमोठ्या मूर्ती व पॅगोडाज दिसतात. ----------------------
आपल्याकडे गल्लीत भाजीपाल्याचा ठेला येतो तसे तेथे सकाळी सकाळी हॉटेलच्या बाहेर पडणाऱ्या पर्यटकांसाठी टू व्हीलरवर पर्यटन उपयोगी सामान घेऊन विक्रेते उभे असतात. पर्स, हॅट्स, खेळणी, शोभेच्या वस्तू आदी भरपूर काही असते त्यांच्याजवळ, पण खूप बार्गेनिंग करावी लागते. लाजला किंवा संकोचला तो फसला अशी स्थिती आहे. विशेषतः महिला यात मोठ्या प्रमाणात असतात. दिवसभर कॉलेज किंवा नोकरी करायची आणि सकाळी सकाळी हे फिरते दुकान घेऊन फिरायचे असा त्यांचा दिनक्रम असतो. विशेष म्हणजे या देशाला एवढा निसर्ग लाभला आहे, प्रचंड हिरवाई आहे; तरी काही इमारती वृक्षवेलींनी अच्छादिलेल्या बघावयास मिळतात. आपल्याकडे गच्चीवर परसबाग असते तसे तेथेही दिसते, त्यामुळे आपल्याला व्हिएतनाममध्ये फिरायला गेल्यावर परकेपण म्हणून जाणवतच नाही. ---------------------------
राजधानी हनोईमध्ये आम्ही इंडियन रेस्टॉरंट माशाअल्लाह मध्ये जेवायला गेलो. दिल्लीच्या नोएडातून शेफ म्हणून आलेल्या अली नामक तरुणाने येथे स्वतःच्या रेस्टॉरंटसची शृंखला सुरू केली आहे. या रेस्टॉरंटमध्येच त्याचा मित्र संदीप गायकवाड भेटला. अहमदनगर जिल्ह्याच्या श्रीगोंदा येथील हा मराठी तरुण भारतीय दूतावासाच्या सिक्युरिटी विभागात सेवारत आहे. भारतीय पर्यटक आल्यावर त्यांचे अतिशय आपलेपणाने आदरातिथ्य करून गप्पा मारण्यात या तरुणांना होणारा आनंद स्पष्टपणे जाणवत होता. कोरोनापूर्वी या शहरात फक्त चार भारतीय रेस्टॉरंट्स होते, आता भारतीय पर्यटक वाढल्याने त्यांची संख्या 40 वर गेल्याचे संदीपने बोलताना सांगितले. दा नांग मध्येही भरपूर इंडियन हॉटेल्स आहेत. तेथे गेल्यावर अगदी जुन्या जमान्यातील राजेश खन्ना, राजकुमार व मधुबालाच्या चित्रपटातील जुनी गाणी ऐकायला मिळतात. एका हॉटेलमध्ये आम्ही लेडी वेटरला 'ओनियन' आणायला सांगितले, तर तिने स्माईल देत ' यु मीन कांडा' (कांदा) म्हणून विचारले. अशावेळी होणारा आनंद काही वेगळाच असतो. ----------------------
भारत व व्हिएतनामचे संबंध अगदी दुसऱ्या शतकापासूनचे जुने सांगितले जातात. भारत कायम व्हिएतनामचा पाठीराखा राहिला आहे. अगदी अलीकडेच म्हणजे जुलै 2023 मध्ये भारताने आपली आयएनएस कृपाण ही युद्धनौका व्हिएतनाम नेव्हीला दिली. भारताने आपली मिसाईल्सयुक्त युद्धनौका दुसऱ्या देशाला देण्याचा हा इतिहासातील पहिलाच प्रकार असल्याचे पाहता दोन्ही देशातील प्रगाढ द्विपक्षीय संबंध स्पष्ट व्हावेत. गेल्या वर्षी जून 2022 मध्ये संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी व्हिएतनामला भेट देऊन 2030 पर्यंतच्या दोन्ही देशांमधील संरक्षण विषयक करारावर स्वाक्षरी केली होती. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनीही गेल्या वर्षी व्हिएतनामला भेटी देऊन वरिष्ठ नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेतल्या होत्या. अलीकडेच मे 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी-7 शिखर संमेलन दरम्यान हिरोशिमा येथे व्हिएतनामच्या पंतप्रधानांसोबत भेट घेतली. तत्पूर्वी 2016 मध्ये मोदी यांनी हनोई येथे भेट देऊन कुआन सु पगोडा येथे भिक्खुंसोबत चर्चा केली होती. यावरून व्हिएतनामसोबतचे आपले राजकीय मित्रत्वाचे संबंधही लक्षात यावेत. -------------------------- व्हिएतनामी चलन डॉन्ग भारताच्या रुपयापेक्षा खूपच कमजोर असल्याने तेथे गेल्यावर आपल्याला करोडपती होण्याचा आनंद अनुभवता येतो खरा व हजार मूल्याच्याच नोटा तेथे असल्याने सर्व खरेदी त्या तुलनेनेच होते. टॅक्सीचे बिल लाखात होत असले तरी ते भारतीय रुपयात चार-पाचशेच असतात. तेव्हा एकदा व्हिएतनाम जाऊन बघायलाच हवे... https://www.lokmat.com/travel/two-wheelers-hindi-songs-and-hospitality-indians-dont-feel-like-strangers-in-vietnam-a-a520-c573/

Vietnam Tour Diary 1

Dec, 2023 व्हिएतनाममध्ये फिरायला जाताय? अवघ्या पाचशे रुपयातच व्हाल मालामाल...
किरण अग्रवाल / विदेशात जायचे म्हटले की सर्वात पहिले चिंता सतावते ती तेथील भाषेची व खर्चाची. यातही भाषेची अडचण आता निकाली निघाली आहे कारण परस्परांचा संवाद हव्या त्या भाषेत ट्रान्सलेट करून देणारे ॲप्स आता निघाले आहेत. राहिला प्रश्न खर्चाचा, तर एक देश असाही आहे जेथे तुम्ही आपले अवघे पाचशे रुपये घेऊन जरी गेलात तरी तेथील चलनात तुम्ही मालामाल होतात व लखोपती ठरतात. व्हिएतनाम हे त्या देशाचे नाव. --------------- अमेरिकेसारख्या बलाढ्य शक्तीला युद्धात झुंजवून हरवणारा देश म्हणून व्हिएतनामकडे पाहिले जाते. सुमारे वीस वर्षे चाललेल्या युद्धात अमेरिकेचे 50 हजाराहून अधिक सैनिक बळी गेले. अखेर अमेरिकेने युद्धातून माघार घेतली व 1975 मध्ये दक्षिण व उत्तर व्हिएतनाम एकत्र झाले. त्यामुळे अमेरिकेला गुडघे टेकायला लावणारा देश म्हणून व्हिएतनामकडे मोठ्या कुतूहलाने पाहिले जाते व व्हिएतनामला भेट देणारे पर्यटक यासंबंधीच्या खुणा, बंकर्स, शस्त्रास्त्रांचे संग्रहालय आवर्जून पाहतात. ---------------
भारतीय रुपयाच्या तुलनेत व्हिएतनामी चलन 'डॉन्ग'चे मूल्य खूपच कमजोर आहे. भारतीय एक रुपया म्हणजे व्हिएतनामचे 280 ते 285 डॉन्ग होतात. या हिशेबाने विचार करता अवघे पाचशे रुपये जरी आपण तेथे घेऊन गेलोत तरी एक लाख 40 हजार 400 डॉन्ग आपल्या खिशात येतात. दहा हजाराचे तब्बल 28 लाख होतात. त्यामुळे आम्हीही व्हिएतनामच्या दौऱ्यावर गेलो असता तेथील राजधानी हनोईच्या विमानतळावर उतरल्यावर 'मनी एक्सचेंज' करून 50 हजारात थेट करोडपती बनलो. अर्थात हे मूल्य डॉन्ग मध्ये असते, त्यामुळे खर्च करताना साधारणतः भारतीय मूल्याच्या थोड्याफार कमी अधिक फरकानेच हजारो डॉन्ग खर्चावे लागतात. या डॉन्गवर हो चि मिन्ह यांचे छायाचित्र असते. उत्तर व दक्षिण व्हिएतनाम या दोघांना एकत्र आणणारे मिन्ह यांना तेथे मोठा मान आहे. हानोई मधील 'माझोलियम'मध्ये त्यांच्या स्मृती जतन करून ठेवल्या गेल्या आहेत. ---------------- दीर्घकालीन युद्धाचा इतिहास असलेला हा देश त्यासंबंधीच्या जखमा व वेदना विसरून आता वेगाने विकासाकडे आगेकूच करीत आहे. भारतातून सुमारे पन्नासेक हजारात थायलंड, दुबई, मलेशिया, इंडोनेशिया आदि ठिकाणी विदेश वारी करू इच्छिणाऱ्या पर्यटकांना नवीन डेस्टिनेशन म्हणून अलीकडे व्हिएतनाम मोठ्या प्रमाणात खुणावू लागले आहे. सुमारे दहा कोटी लोकसंख्येच्या या देशाला तीन हजार किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला असल्याने निसर्ग सौंदर्याची जणू लयलूटच या देशात अनुभवयास मिळते. ---------------- पाण्याने वेढलेल्या पर्वतराजींचे व युनेस्को प्रमाणित 'हा लॉंग बे' व क्रूझने त्यातील फेरफटका, राजधानीचे शहर व मध्यवस्तीतून जाणाऱ्या रेल्वेचे आकर्षण असलेले 'ह नोई', सुंदर समुद्रकिनाऱ्यासाठी व ड्रॅगन ब्रिजवरील आतिषबाजीसाठी प्रख्यात असलेले 'दा नांग', पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून ज्याकडे पाहता यावे असे धुक्यात हरविणारे 'बाना हिल्स', भल्या मोठ्या बास्केटच्या आकारातील गोल बोटीत बसून भ्रमंती करायला मिळणारे 'कोकोनट व्हिलेज', सा पा डोंगर, मेकाँग आयलंड, भारतीय संस्कृतीच्या पाऊलखुणा जपून असलेला 'मिसान' डोंगराळ प्रदेश, ओल्ड सिटी म्हणून युनेस्कोतर्फे वर्ल्ड हेरिटेज साईट घोषित व आकाश कंदीलांनी सजलेल्या बोटीतून प्रवासाचा आनंद देणारे 'होई अन' आदी अनेक ठिकाणे आहेत, जेथे भेटी देता येऊ शकतात. निसर्गाला जपत व त्यासोबत विकासाशी सांगड घालत हा देश प्रसन्नता व बहारदार पर्यटनासाठी वेगाने डेव्हलप होत असल्याने व्हिएतनाममधील ट्रिप संस्मरणीयच ठरते. (कार्यकारी संपादक, लोकमत अकोला) https://www.lokmat.com/travel/vietnam-an-emerging-tourist-destination-favourite-among-indians-as-rupee-is-bigger-than-vietnam-dong-a-a520-c573/

Happy New Year 2024

Saraunsh published in Akola Lokmat on Dec 31, 2023

https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20231231_4_1&fbclid=IwAR2TRdBFRIkYqfHQVqP2Gj1rnlOaC3yP7VlG7j4dSvdrXS4mxv5B5sl4hF4
https://www.lokmat.com/editorial/resolve-to-awaken-humanity-with-development-is-necessary-a-a520-c310/?fbclid=IwAR2KN3NQvhPNX6Lu02LeAjNXRqePLaLrRJ5r0XZx8hldTyNUUa8CyhYR9m8

चिंब भिजवणारा स्नेह वर्षाव...

27 Dec, 2023 चिंब भिजवणारा स्नेह वर्षाव...
माझ्या वाढदिवसानिमित्त काल आपण साऱ्या मित्रांनी केलेल्या स्नेह सदिच्छांच्या वर्षावात मी अगदी चिंब भिजलो. त्यासाठी धन्यवाद शब्द अतिशय तोकडा आहे. काहींनी प्रत्यक्ष भेटून, तर काहींनी भ्रमणध्वनी, संदेशांद्वारे शुभेच्छा दिल्यात. फेसबुकची वॉल भरभरून वाहिली. प्रवाह इतका निरंतर व अथांग होता की प्रत्येकाला एकनॉलेज करणेही अवघड बनले. आपण समजून घ्याल अशी खात्री आहे. मित्रांनो, आपल्या या सदिच्छा हीच माझी ऊर्जा व तेच माझे पाठबळ. हा स्नेह अक्षय असू द्या हीच अपेक्षा... Many many Thanks to everyone ... #KiranAgrawal #FBWishes

साहित्य सेवेचा बहरलेला 'अंकुर'...

23 Dec, 2024 साहित्य सेवेचा बहरलेला 'अंकुर'...
अंकुर साहित्य संघाच्या 61व्या अखिल भारतीय अंकुर मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणा म्हणून जाण्याचा योग आला. गेल्या वर्षी याच अंकुरच्या धुळ्यातील अधिवेशनात समारोपाच्या समारंभास गेलो होतो. तेव्हाचे माझे भाषण लक्षात ठेवून आयोजकांनी यावेळी मुद्दाम पुन्हा बोलाविले. अकोला वाशिम संयुक्त जिल्हा असताना मालेगावमध्ये स्थापन झालेल्या व आता अकोला मुख्यालय असलेल्या अंकुर साहित्य संघाने अल्पावधीत 61 साहित्य संमेलने आयोजित करून संपूर्ण राज्यात व राज्याबाहेरही हा संघ पोहोचविला ही खरी साहित्य सेवा म्हणायला हवी. ****
61व्या संमेलनाच्या अध्यक्ष, चाळीसगावच्या प्राचार्य डॉ साधनाताई निकम आहेत. त्यांचे माझे माहेरचे नाते. संमेलनाचे उद्घाटन प्रख्यात समाजसेवी प्रा. डॉ. संतोष हुशे यांनी केले तर स्वागताध्यक्ष प्रा. ललित काळपांडे आहेत. राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य पुष्पराज दादा गावंडे, चाळीसगावचे डॉ. विनोद कोतकर, अकोल्याचे डा. श्रीकांत काळे, डॉ. प्रमोद काकडे, श्रीमती रेखाताई शेकोकार, शीलाताई गहिलोत आदी मान्यवर व्यासपीठावर समवेत होते. ****
संवेदना व भावभावनायुक्त साहित्यच समाजाला अंतर्मुख व्हायला भाग पाडते, त्यातूनच जबाबदारी - कर्तव्याच्या व माणुसकीच्या जाणिवा अंकुरतात; पण हल्ली साहित्यातही स्वमग्नता आकारास येताना दिसत आहे, असे प्रतिपादित करताना आजच्या व्हाट्सअप कल्चर व वाढत्या विद्वेषी वातावरणात समाजाच्या सुदृढ व वैचारिक मशागतीला पूरक ठरणारे साहित्य प्रसविण्याची गरज असल्याची मांडणी केली. अंकुरचे केंद्रीय अध्यक्ष हिम्मत ढाळे, कार्यावाहक तुळशीराम बोबडे तसेच वासुदेवराव खोपडे, सदाशिव शेळके, मनोहर घुगे, प्रा संजय कावरे, प्रा मोहन काळे आदी पदाधिकाऱ्यांच्या धडपडीतून साहित्य सेवेचा 'अंकुर' आज बहरलेला दिसत आहे. हिम्मत ढाळे व बोबडे जी यांच्या प्रेमळ आग्रहामुळे पुन्हा या साहित्य उत्सवात सहभागी होता आले, धन्यवाद हिम्मतराव व तुळशीराम जी... #AnkurSahityaSangh #AnkurAkola #KiranAgrawal

Saraunsh published in Akola Lokmat on Dec. 24, 2023

https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20231224_2_7&fbclid=IwAR19Hwyn4n5J96NAYAKPKGRKfobzDyejLHBoYe_Tuys83TxIZD-YOjwH1Ss
https://www.lokmat.com/editorial/fight-for-space-when-will-fight-for-peoples-questions-a-a520-c310/?fbclid=IwAR2TRdBFRIkYqfHQVqP2Gj1rnlOaC3yP7VlG7j4dSvdrXS4mxv5B5sl4hF4